दोन फळ्या ठेवण्याच्या निर्णयामुळे आंदोलन मागे

पोलीस बंदोबस्तात गोदावरी नदीपात्रातील बंधाऱ्यांच्या फळ्या काढून जायकवाडीला पाणी सोडण्यात आले. आता पुणतांबे (ता.कोपरगाव), नाऊ र, सराला व खानापूर बंधाऱ्यांत दोन फळ्या ठेवण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतल्यानंतर गावकऱ्यांनी अखेर आंदोलन मागे घेतले. मात्र सरकारी निर्णयाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.

गोदावरी नदीपात्रातील बंधाऱ्यांमध्ये जायकवाडीकडे निघालेले पाणी फळ्या टाकून अडविण्यात आले होते. काल ७ बंधाऱ्यांच्या फळ्या काढण्यात आल्या. मात्र पुणतांबे व नाऊर बंधाऱ्यावर हजारो शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले होते. जलसंपदाचे अधिकारी मात्र फळ्या काढण्यावर ठाम होते. त्याकरिता मोठा फौजफाटा ठेवण्यात आला होता. गुन्हे दाखल करा पण पाणी सोडू देणार नाही. पाणी सोडले तर जलसमाधी घेऊ, असा इशारा शेतकरी देत होते. त्यामुळे प्रशासनाची मोठी कोंडी झाली होती.

पुणतांबे बंधाऱ्यावर आज सकाळी आंदोलकांची खासदार सदाशिव लोखंडे यांनी भेट घेतली. प्रांताधिकारी रविंद्र ठाकरे, नायब तहसीलदार माणिक आहेर, पोलीस उपअधीक्षक अभिजित शिवथरे, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र  शिंदे यांच्याशी चर्चा करण्यात आली. मात्र जादा टाकलेल्या फळ्या काढूनच घ्याव्या लागतील, यावर अधिकारी ठाम होते. अखेर पाणी सोडण्यापूर्वी पुणतांबे बंधाऱ्याचा पंचनामा करण्यात आला होता. त्यावेळी तीन फळ्या इतके पाणी बंधाऱ्यात होते. तेवढे पाणी ठेऊ न उरलेले पाणी सोडून देण्याचा निर्णय त्यांनी सांगितला. अखेर गावकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. या वेळी सरपंच धनंजय धनवटे, धनंजय जाधव, सुहास वहाडणे, प्रताप धोर्डे, सुभाष वहाडणे, धनंजय धोर्डे, सुधाकर जाधव आदि उपस्थित होते.

नाऊर येथे सकाळपासून आंदोलन सुरु होते. आंदोलकांशी आमदार भाऊसाहेब कांबळे, सभापती दीपक पटारे यांनी चर्चा केली. या वेळी तहसीलदार सुभाष दळवी, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे उपस्थित होते. पूर्वी नदीपात्रात दोन फळ्या होत्या, तेवढय़ाच ठेवण्यात येतील, असे जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी ठामपणे सांगितले. त्यानंतर कांबळे व पटारे यांनी मध्यस्थी करुन पाणी सोडण्यास शेतकऱ्यांना राजी केले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आता बंधाऱ्यात केवळ दोन फळ्या ठेवण्यात येणार आहेत. उर्वरित पाणी सोडून देण्यास प्रारंभ झाला असून आज पुणतांबे व नाऊ रचे पाणी सोडून देण्यात आले. हे पाणी वांजरगावपर्यंत पोहोचले आहे. आता उद्या रविवारी सर्व बंधाऱ्यांच्या फळ्या काढून जायकवाडीला पाणी सोडले जाईल.