News Flash

बीडमध्ये संदीप क्षीरसागर ‘जायंट किलर’!

 बीड जिल्ह्य़ात जयदत्त क्षीरसागर यांनी शिक्षण संस्था व सहकारी संस्थांच्या माध्यमातून प्रभाव निर्माण केला.

|| वसंत मुंडे

जयदत्त यांची सद्दी संपली : –  बीड मतदार संघात शिवसेनेचे मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर या काका-पुतण्यातील अटीतटीच्या लढतीत शेवटच्या फेरीत अठराशे मतांच्या फरकाने पुतण्याने तब्बल सहा निवडणुकांचा अनुभव, तगडी प्रचार यंत्रणा असलेल्या काकाला पराभवाची धूळ चारत मतदार संघावरील ३० वर्षांपासून अधिकची सत्ता संपुष्टात आणली. तीन वर्षांपूर्वी कौटुंबिक कलहानंतर काका विरुद्ध  बंड केलेल्या संदीप यांनी पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुकीत विजय मिळवून चमत्कार घडवल्याने संदीप ‘जायंट किलर’ ठरले आहेत.

बीड जिल्ह्य़ात जयदत्त क्षीरसागर यांनी शिक्षण संस्था व सहकारी संस्थांच्या माध्यमातून प्रभाव निर्माण केला. नगरपालिकेत ३० वर्षांपासून डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचे एकहाती वर्चस्व असून इतर स्थानिक संस्थांवरही क्षीरसागरांचाच वरचष्मा राहिला.  मागील दोन निवडणुकीत बीड मतदार संघातून क्षीरसागरांनी सलग विजय मिळवला. सुरुवातीला ७६ हजार मताधिक्याने निवडून आल्यानंतर पालकमंत्रिपदाची त्यांची इच्छा पूर्ण झाली.

मागच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लाटेत जिल्ह्यतील सर्व जागा भाजपकडे गेल्या असताना क्षीरसागरांनी आपली जागा कायम राखली. मात्र तीन वर्षांपूर्वी कौटुंबिक कलहानंतर नगरपालिका निवडणुकीत बंधू रवींद्र आणि पुतणे संदीप क्षीरसागर यांनी बंड करून २० नगरसेवक निवडून आणून उपनगराध्यक्षपद मिळवले. तर जिल्हा परिषद निवडणुकीतही ग्रामीण भागात चार सदस्य निवडून आणून काका जयदत्त व डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्यासमोर आव्हान उभे केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून संदीप यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व अजित पवार यांच्याकडून पाठबळ मिळत असल्याने संदीप यांनी विधानसभेवरच दावा करत मागील दोन वर्षांपासून मतदार संघात बांधणीला सुरुवात केली. दोन्ही काकांकडे शैक्षणिक संस्थांसह स्थानिक संस्थांची सत्ता, ३० वर्षांंपासून निवडणुका लढवण्याचा अनुभव असल्याने संदीप यांचा टिकाव लागेल का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. संदीप यांना तरुण वर्गातून मिळणारे समर्थन लक्षात आल्यानंतर दोन्ही काकांनी त्यांची प्रतिमा गुंडगिरीची निर्माण करण्याचाही प्रयत्न केला. लोकसभा निवडणुकीनंतर जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश करून मंत्रिपद मिळवले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संदीप यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर पहिल्यांदाच निवडणुकीच्या मदानात उतरलेल्या संदीप यांनी अनुभवी काकाला धोबीपछाड दिला.

वर्षभरापासून संदीप यांनी नगरपालिकेतील भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवत शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी काकाविरुद्ध सातत्याने संघर्ष कायम ठेवला. शहरातील घाण पालिकेत टाकल्याच्या कारणावरून संदीप यांच्या नगरसेवकांना अपात्र करण्याचीही कारवाई करण्यात आली. संदीप यांची सामाजिक, राजकीय आणि आíथक पातळीवर चोहोबाजूंनी कोंडी करण्याची संधी दोन्ही काकांनी सोडली नाही. मात्र, संदीप यांनी तरुण सहकाऱ्यांची फळी निर्माण करून दररोज सकाळी सात वाजल्यापासूनच मतदार संघ पिंजून काढला. सामान्य माणसाची छोटी छोटी कामे तत्काळ मार्गी लावण्यावर भर दिल्याने संदीप यांना जनमानसातूनही समर्थन मिळाले. जयदत्त क्षीरसागर यांची स्थानिक पातळीवरील धुरा संदीपच सांभाळत असल्याने जयदत्त यांचा थेट लोकांशी संपर्क कमी होता. याचाही त्यांना फटका बसला. निवडणुकीच्या मदानात माजी आमदार प्रा. सुरेश नवले, राजेंद्र जगताप, उषा दराडे, सय्यद सलीम, जनार्दन तुपे, सिराज देशमुख, सुनील धांडे या सात माजी आमदारांची साथ मिळवत संदीप यांनी मिळवली.

दोन्ही क्षीरसागर काकांनी मात्र माजी आमदारांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण सर्व माजी आमदारांनी संदीप यांना साथ दिल्याचे निकालातून स्पष्ट झाले. क्षीरसागर काकांनी संस्थेची तगडी यंत्रणा उभी करून विजय मिळवण्याचा चंग बांधला होता. तर संदीप यांनी तरुण कार्यकत्रे आणि संपर्काच्या जोरावर प्रचार यंत्रणा राबवत दोन्ही काकांच्या नाकी दम आणला. अखेरच्या फेरीत संदीप यांनी अठराशे मतांनी दिग्गज काका जयदत्त क्षीरसागरांना पराभवाची धूळ चारली. त्यामुळे जयदत्त क्षीरसागरांची या मतदार संघावरील ३० वर्षांची सद्दीच संपली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2019 3:18 am

Web Title: jayant killer sandeep kshirsagar akp 94
Next Stories
1 लोकसभेतले हेवेदावे विधानसभेत मावळले,
2 वर्धा जिल्ह्य़ात भाजप सरस, सेना शून्य
3 ‘वंबआ’मुळे काँग्रेस विजयापासून ‘वंचित’
Just Now!
X