विमान कंपन्या, विमानातील कर्मचारी आणि प्रवासी यांच्यात उडणारे खटके काही नवीन नाहीत. काही महिन्यांपूर्वीच एअर इंडिया आणि खासदार रवींद्र गायकवाड यांच्यात वाद झाला होता. आता हा वाद संपतो न संपतो तोच आणखी एक वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. जेट एअरवेजच्या हलगर्जीपणाचा त्रास महाराष्ट्रातील नेते खासदार राजू शेट्टींना सोसावा लागला आहे. दिल्लीला निघालेल्या शेट्टी यांनी मुंबई विमानतळावर वेळेत पोहोचून बोर्डिंग पासही घेतले होते. पण त्यांना न घेताच विमानानं उड्डाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी मुंबईवरून दिल्लीला निघाले होते. त्यासाठी ते मुंबई विमानतळावर पोहोचले. आज सकाळी सहा वाजता त्यांनी विमानाचे बिझनेस क्लासचे तिकीटही घेतले. तासभर आधीच ते विमानतळावर पोहोचले होते. बोर्डिंग पासही घेतले. विमानाच्या उड्डाणाला वेळ असल्याने ते काही वेळ लॉन्जमध्ये बसले. त्यांनी रजिस्टरमध्ये नोंदही केली होती. काही वेळाने ते बोर्डिंगसाठी लॉन्जबाहेर आले. पण तेथील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या उत्तराने त्यांना धक्काच बसला. बोर्डिंगचे द्वार बंद झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. बोर्डिंग पास घेतलेला असताना आणि रजिस्टरमध्ये नोंद केलेली असताना, मला न घेता विमानाने उड्डाण भरलेच कसे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. इतकंच नाही तर हलगर्जीपणाबाबत त्यांनी जेट एअरवेजला सांगितले. पण कंपनीनेही हात वर केले. दिल्लीला महत्त्वाच्या बैठकीसाठी जायचे असल्याने पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, अशी विनंती त्यांनी केली. त्यावेळी ७ वाजताच्या विमानाचे बदली तिकीट दिले खरे पण त्यासाठी त्यांच्याकडून आणखी २ हजार रुपये वसूल केले. पण यात आपली काहीही चूक नसल्याने त्यांनी पैसे भरण्यास नकार दिला. पण जेट एअरवेजनेही हेका कायम ठेवला. अखेर शेट्टी यांनी कार्डद्वारे २ हजार रुपये अदा केले. त्याची पावती मागितली असता कंपनीने तीही देण्यास नकार दिला. या प्रकाराबद्दल राजू शेट्टींनी नाराजी व्यक्त केली आहे. जेट एअरवेजमुळे झालेल्या मनस्तापाबद्दल विमानतळ प्राधिकरणाकडे शेट्टी तक्रार करणार आहेत, अशी माहिती ‘स्वाभिमानी’चे प्रवक्ते अॅड. योगेश पांडे यांनी दिली.