देशावर करोनारुपी आलेलं संकट दूर करण्यासाठी राज्याचे गृहनिर्माण मंत्री व सोलापूरचे नूतन पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज पंढरीच्या विठूरायारला साकडं घातलं आहे. त्यांनी आज पंढरपुरास भेट दिली.

या करोनाच्या विषाणूंचा नायनाट करण्याची ताकद विठ्ठलामध्ये आहे. प्रिय पांडूरंगा..करोनाचे संकट दूर कर असे आव्हाड यांनी यावेळी म्हटलं. तर करोनामुळे सामाजिक वास्तव समोर आले असून स्वातंत्र्यापेक्षा अधिकचे स्थलांतर आत्ता झाल्याचेही त्यांनी बोलून दाखवलं.

सोलापूरचे नूतन पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी पंढरपूरचा धावता दौरा केला. इथे आल्यावर थेट त्यांनी श्री विठ्ठलाचे मंदिर गाठले. मात्र मंदिर बंद असल्याने त्यांनी संत नामदेव पायरी शेजारील संत चोखोबा यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

या वेळी आव्हाड म्हणाले, सध्या करोनामुळे शेतकरी उध्वस्त झाला आहे. शेतमजूर उपाशी तडफडत आहे. रोजंदारी करणारा मजूर अन्न पाण्याविना घरी आहे. विठुराया अन्न, धान्याविना तुझी लेकरं उपाशी झोपली आहेत. तुला हे कसे पाहवत आहे. जागा हो… असे साकडे आपण पांडुरंगाचे निस्सीम भक्त संत चोखोबा यांच्याकडे घातले आहे ते पांडुरंग चरणी पोहचेल.

करोनामुळे होत असलेल स्थलांतर हे भयानक आहे. माणुसकीची ओळख करून देणारे हे दिवस आहेत. त्यामुळे जे लोक चालत आहेत. त्यांना आपल्या घासातील एक घास द्या असे आवाहन यावेळी मंत्री आव्हाड यांनी केले. दरम्यान, सर्वांनी शिस्त पाळावी. तसेच जिल्हाबंदी कडक पाळा अशा सूचना पोलीस प्रशासनाला दिल्या.