News Flash

खरंच… हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे; जितेंद्र आव्हाडांनी घेतली भाजपाची फिरकी

भाजपा नेत्यांच्या टीकेला उपरोधिक टोला

जितेंद्र आव्हाड यांनी उपरोधिकपणे भाजपावर निशाणा साधला. (संग्रहित छायाचित्र)

करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या कडक लॉकडाउनच्या निर्णयावरून विरोधी पक्ष भाजपातील नेते सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या नेत्यांनी कडक निर्बंधावरून ठाकरे यांना काही सवालही उपस्थित केले होते. आरोपांवरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ‘खरंच… हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे’ असं शिषर्क असलेल्या कवितेतून भाजपासमोर गुगली टाकली आहे.

करोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेले निर्णय आणि त्यावर भाजपाकडून झालेल्या टीकेचा समाचार जितेंद्र आव्हाड यांनी उपरोधिकपणे घेतला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी एक कविता लिहिली आहे. ही कविता त्यांनी फेसबुकवर शेअर केली असून, भाजपा नेत्यांना चिमटे काढले आहेत.

काय आहे जितेंद्र आव्हाडांची कविता?

खरंच हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे..!!
कधी थाळ्या वाजवायला
लावल्या नाही…
ना कधी मेणबत्या आणि दिवे
लावायला लावले …..
निर्णय घेताना घेतले
विश्वासात…..
विरोधकांचे त्यामुळेच
फावले…….
शांत राहून तो लढत आहे
विरोधकांचे खरंच राईट आहे….
खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे….!!

मंदिर उघडा, बाजार उघडा
शाळा उघडा ते म्हणाले…..
परीक्षा पुढे ढकलल्या तर
ते रस्त्यावर पुन्हा पुन्हा आले….
कोरोना वाढला तर ते आता
फक्त सरकारला दोषी ठरवत आहे…
विरोधकांचे खरंच राईट आहे….
खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे….!!

इमान तर विकले नाहीच
ना कोणत्या सरकारी कंपन्या विकल्या…..
कोरोनाचे आकडे लपवले नाहीच
खोट्याने न कधी माना झुकल्या….
घरी पत्नी आणि मुलगा
आजारी असतांना तो मात्र लढत आहे….
विरोधकांचे खरंच राईट आहे….
खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे….!!

ना कुठे बडबोले पणा
ना कशाचा बडेजाव..
आठ हजार कोटीचे
विमान नको….
ना कोणत्या प्रकरणात
घुमजाव……
जे करतोय ते प्रामाणिक पणे
तो करतो आहे…..
विरोधकांचे खरंच राईट आहे….
खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे….!!

व्यापाऱ्यांचे ऐकून घेतोय…
विद्यार्थ्यांचे ऐकून घेतोय….
गोर गरीब जनतेला
एकवेळ शिवभोजन मोफत देतोय….
निसर्ग चक्रीवादळ,कोरोना संकट
शेतकऱ्यांच्या अडचणी
साठी तो शांततेत लढतो आहे ……
विरोधकांचे खरंच राईट आहे….
खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे…..!!

ना क्लीन चिट देता आली…
ना खोटी आकडेवारी देता आली…
निवडणूक काळात तर कधी
ना अशक्य घोषणा त्याला करता आली…
जे होण्यासारखे आहे तेच तो करतोय…
विरोधकांचे खरंच राईट आहे….
खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे….!!

महाराष्ट्राचे मीठ खाऊन
निधी पंतप्रधान निधीला ते देताय…
उठ सूठ, सकाळ संध्याकाळ
ते टीका सरकारवर करताय…..
तो मात्र टिकेला उत्तर न देता
सर्वसामान्यांसाठी झटत आहे…
विरोधकांचे खरंच राईट आहे….
खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे….!!

– डॉ.जितेंद्र आव्हाड

करोनासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेल्या निर्णयांवर भाजपा नेत्यांकडून शंका उपस्थित करत टीका होत आहे. विशेषतः दुसरा लॉकडाउनचा विषय चर्चेत आल्यानंतर भाजपाने कडाडून विरोध केला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपाच्या नेत्यांनी विविध मागण्याही केल्या होत्या. या सर्वच बाबींचा आव्हाड यांनी आपल्या कवितेतून समाचार घेतला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2021 3:30 pm

Web Title: jitendra awhad write poem about uddhav thackeray taunt to bjp leaders devendra fadnavis chandrakant patil bmh 90
Next Stories
1 “बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची मशाल विझली, आता त्याचा धूर दिसतोय”, प्रवीण दरेकरांचा शिवसेनेवर निशाणा!
2 “भाजपाची अवस्था करून करून भागले नी…,”
3 “ताईसाहेब…”, पंकजा मुंडेंच्या टीकेला धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर
Just Now!
X