UP Election jitin prasad join bjp : शिवसेनेनं जितीन प्रसाद यांच्या भाजपा प्रवेशावर भाष्य करत काँग्रेसच्या सद्यस्थिती अधोरेखित केली. त्याचबरोबर काँग्रेस नेतृत्वाबद्दल सल्लाही दिला आहे... (संग्रहित छायाचित्र)
News Flash

राहुल गांधींना टीम तयार करावीच लागेल; शिवसेनेचा काँग्रेसला सल्ला

शिवसेनेनं जितीन प्रसाद यांच्या भाजपा प्रवेशावर भाष्य करत काँग्रेसच्या सद्यस्थिती अधोरेखित केली. त्याचबरोबर काँग्रेस नेतृत्वाबद्दल सल्लाही दिला आहे...

शिवसेनेनं जितीन प्रसाद यांच्या भाजपा प्रवेशावर भाष्य करत काँग्रेसच्या सद्यस्थिती अधोरेखित केली. त्याचबरोबर काँग्रेस नेतृत्वाबद्दल सल्लाही दिला आहे... (संग्रहित छायाचित्र)

अलिकडेच काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेल्या जितीन प्रसाद यांच्या पक्षांतरावर भाष्य करत शिवसेनेनं काँग्रेस काँग्रेसच्या नेतृत्वाबद्दल राजकीय सल्ला दिला आहे. जितीन प्रसाद यांच्या पक्षांतराला पुढील वर्षी उत्तर प्रदेशात होत असलेल्या निवडणुकांची पार्श्वभूमी असल्याचा मुद्दा मांडत शिवसेनेनं भाजपाचाही समाचार घेतला आहे. “जितीन प्रसाद यांना भाजपामध्ये घेण्यामागे म्हणे उत्तर प्रदेशातील ब्राह्मण मतांची बेरीज आहे. आता उत्तर प्रदेशातील ब्राह्मण मतांवर प्रसाद यांचा इतका प्रभाव असता तर ही मते ते काँग्रेसकडे का वळवू शकले नाहीत,” असं म्हणत शिवसेनेनं भाजपातील अंतर्गत कलहांवरही बोट ठेवलं आहे.

शिवसेनेनं सामना अग्रलेखातून जितीन प्रसाद यांच्या पक्षांतरवर भूमिका मांडली आहे. “उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीतही दारुणरीत्या पराभूत झालेले जितीन प्रसाद हे अखेर भाजपावासी झाले आहेत. प्रसाद हे काँग्रेसचे तरुण नेते. त्यांचे घराणे परंपरागत काँग्रेसचे. हे महाशय मनमोहन मंत्रिमंडळात मंत्री होते. नंतर विधानसभा, लोकसभा हरत राहिले. आता त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. जितीन प्रसाद यांच्या येण्याचा उत्सव भाजपामध्ये साजरा केला जात आहे. यामागे उत्तर प्रदेश निवडणुकांचे जातीय गणित आहे. जितीन प्रसाद यांना भाजपामध्ये घेण्यामागे म्हणे उत्तर प्रदेशातील ब्राह्मण मतांची बेरीज आहे. आता उत्तर प्रदेशातील ब्राह्मण मतांवर प्रसाद यांचा इतका प्रभाव असता तर ही मते ते काँग्रेसकडे का वळवू शकले नाहीत. याचा दुसरा अर्थ असाही काढता येईल की, उत्तर प्रदेशातील भाजपाचा पाठीराखा असलेला उच्चवर्णीय मतदार आता त्यांच्यापासून दूर जात आहे. आतापर्यंत उत्तर प्रदेशात इतर कोणत्याही गणितांची व चेहऱ्यांची गरज भारतीय जनता पक्षाला लागली नव्हती. फक्त नरेंद्र मोदीच सब कुछ हेच धोरण होते. राममंदिर किंवा हिंदुत्वाच्या नावावर मते मिळत होती. आता उत्तर प्रदेशात प्रकृती इतकी खालावली आहे की, जितीन प्रसाद यांच्याकडून ब्राह्मण मतांचा आधार घ्यावा लागत आहे. जितीन प्रसाद हे काँग्रेसमध्ये होते तेव्हा काँग्रेसला फायदा नव्हता व भाजपामध्ये गेले म्हणून भाजपास उपयोग नाही. प्रश्न तो नसून काँग्रेस पक्षातील शेवटचे शिलेदारही आता नौकेवरून टणाटण उड्या मारू लागले आहेत हा आहे. पुन्हा हे फक्त उत्तर प्रदेशातच घडतेय असे नाही,” असं शिवसनेनं म्हटलं आहे.

‘ऐकले नाही तर अधोगतीच’; ‘जी-२३’मधील नेत्यांचे काँग्रेस नेतृत्वाला आवाहन

“राजस्थानात सचिन पायलट यांनी आता पक्ष नेतृत्वास निर्वाणीचा इशारा दिला आहे. सचिन पायलट व त्यांचे समर्थक केव्हापासून अस्वस्थ आहेत व त्यांचा एक पाय बाहेर आहेच. सचिन पायलट यांनी वर्षभरापूर्वी बंडच केले होते. ते कसेबसे थंड केले तरी आजही खदखद सुरूच आहे. पंजाब काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे व मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर यांच्या विरोधात बंडखोर गटाने आरपारची लढाई सुरू केली आहे. त्यात प्रसाद यांच्यासारखे नेते पक्ष सोडून भाजपामध्ये जातात तेव्हा चिंता वाढते. ‘जी २३’ या काँग्रेसच्या बंडखोर गटाचे सदस्य असलेले जितीन प्रसाद व त्यांचे कुटुंब हे काँग्रेसनिष्ठच होते. त्यांच्या पिताश्रींनी सोनिया गांधी यांच्याविरोधात काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. सचिन पायलट यांचे पिताश्री राजेश पायलटही त्याच पद्धतीचे बंडखोर होते, पण त्यांनी कधी पक्ष सोडण्याची भाषा केली नव्हती. दुसरे महत्त्वाचे नेते मध्य प्रदेशातील ज्योतिरादित्य शिंदे यांनीही मध्य प्रदेशातील २२ काँग्रेस आमदारांसह पक्ष सोडला व कमलनाथांचे सरकार कोसळले. या पडझडीमध्ये उरल्यासुरल्या काँग्रेसला फटका बसत आहे. पश्चिम बंगालात काँग्रेसचा खतरनाक पराभव झाला. केरळात काँग्रेसची स्थिती चांगली असतानाही सत्ता स्थापन करता आली नाही. आसामात संधी असतानाही काँग्रेस मागे पडली. सत्ता असलेले पुद्दुचेरी गमावले. या सगळ्या पडझडीत काँग्रेसने काय करावे आणि कसे उभे राहावे? यावर चर्चा होत नाही. काँग्रेस पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नाही अशी मागणी ‘जी २३’चे बंडखोर नेते वारंवार करीत आहेत. काँग्रेस हा आजही देशातील प्रमुख राष्ट्रीय तसेच विरोधी पक्ष आहे. काँग्रेसने स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्योत्तर काळातही उत्तम काम केले. आज देश जो उभा आहे तो घडविण्यात काँग्रेस राजवटीचे योगदान आहे. आजही जगाच्या पाठीवर ‘नेहरू-गांधी’ ही देशाची ओळख पुसता आलेली नाही. मनमोहन सिंग, नरसिंह राव, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचा ‘ठसा’ कोणाला पुसता आलेला नाही. हेच काँग्रेसचे भांडवल आहे, पण महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ वगळता काँग्रेस आपल्या अस्तित्वासाठी झुंज देत आहे,” असं भाष्य करत शिवसेनेनं काँग्रेस नेतृत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे.

पंजाब प्रदेश काँग्रेसबाबतचा अहवाल सोनिया गांधी यांना सादर

उत्तर प्रदेशात योगी विरुद्ध मोदी असा सुप्त संघर्ष सुरू असल्याचे ‘मीडिया’ रिपोर्ट

“देशाचा राजकीय समतोल बिघडविणारे हे चित्र आहे. लोकशाहीला मारक असलेली ही स्थिती आहे. पक्षांतर्गत बंडाळ्या या होतच असतात. त्यापासून भाजपासारखे पक्षही मुक्त नाहीत. प. बंगालातील भारतीय जनता पक्ष आज सैरभैर झाला आहे व निवडणुका जिंकण्यासाठी तृणमूल काँग्रेसमधून उधारीवर घेतलेले सर्वजण पुन्हा स्वगृही निघाले आहेत. सुवेन्दू अधिकारी यांच्याविरोधात तर मुकुल रॉय यांनी उघड बंड केले. हे बंड भाजपा नेत्यांना शमविता आलेले नाही. उत्तर प्रदेशात योगी विरुद्ध मोदी असा सुप्त संघर्ष सुरू असल्याचे ‘मीडिया’ रिपोर्ट आहेत. हे सर्व जरी असले तरी मोदी, शाह, नड्डा यांचे नेतृत्व मजबूत आहे व भाजपाचे पक्ष संघटन जमिनीवर आहे. जुने गेले तरी नवे उभे करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. निवडणुका जिंकण्याचे तंत्र त्यांनी अवगत केले आहे. जसे की उत्तर प्रदेशच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनुपचंद्र पांडे यांची नेमणूक निवडणूक आयुक्त म्हणून केली. श्रीमान पांडे हे उत्तर प्रदेशचे माजी मुख्य सचिव आहेत. आता त्यांच्याच निगराणीखाली उत्तर प्रदेशच्या निवडणुका होतील. पुन्हा वर्षभरात जितीन प्रसादसारख्या इतर पक्षांतील तरुण नेत्यांची भरती केली जाईल. उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे तरुण नेते जितीन प्रसाद यांचा भाजपामधील प्रवेश हा काही मुद्दा असू शकत नाही, पण प्रसाद यांच्या रूपाने काँग्रेसला खिंडार पाडल्याचा उत्सव भाजपाने सुरू केला आहे, तो मनोरंजक आहे. जितीन प्रसाद, सचिन पायलट, ज्योतिरादित्य शिंदे हे अलीकडच्या काळातील काँग्रेसचे तरुण चेहरे होते व त्यांच्याकडून अपेक्षा होत्या. अहमद पटेल, राजीव सातव यांच्या निधनाने आधीच काँग्रेसमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. त्यात त्या पक्षातील काही तरुण नेत्यांनी भाजपाचा मार्ग स्वीकारला हे बरे नाही. काँग्रेस हा आजही देशभरात जनमानसात मुळे घट्ट रुजलेला पक्ष आहे. सोनिया गांधी या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा आहेत. आतापर्यंत त्यांनी पक्षाची धुरा समर्थपणे सांभाळली आहे. आता राहुल गांधी यांना पक्षात त्यांची एक मजबूत टीम तयार करावीच लागेल. तेच काँग्रेसपुढील प्रश्नचिन्हाचे ठोस उत्तर ठरू शकेल,” असा सल्ला शिवसेनेनं दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2021 7:50 am

Web Title: jitin prasad join bjp shiv sena rahul gandhi sanjay raut narendra modi bmh 90
Next Stories
1 केंद्र सरकारच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप जनतेचा बळी – नाना पटोले
2 पाठीवरील पंपाच्या ओझ्यापासून शेतकऱ्याची सुटका
3 बीडमध्ये ‘म्युकरमायकोसिस’मुळे आठ रुग्णांनी एक डोळा गमावला
Just Now!
X