17 November 2017

News Flash

गडचिरोलीतील रानम्हशींना हक्काचे घर

महाराष्ट्रातून नामशेष होण्याची स्थिती ओढवलेल्या रानम्हशींना अखेर गडचिरोली जिल्ह्य़ात कायद्याने हक्काचे घर मिळाले आहे.

खास प्रतिनिधी, नागपूर | Updated: January 31, 2013 5:34 AM

* मध्य भारतात रानम्हशींची संख्या १९६६ ते १९९२ दरम्यान ८० टक्के घटली
* छत्तीसगड आणि महाराष्ट्रात मिळून २०० रानम्हशी अस्तित्वात
* जगातील रानम्हशींची संख्या  ४००० असल्याचा अंदाज  

महाराष्ट्रातून नामशेष होण्याची स्थिती ओढवलेल्या रानम्हशींना अखेर गडचिरोली जिल्ह्य़ात कायद्याने हक्काचे घर मिळाले आहे. गेल्या २४ जानेवारीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत गडचिरोली जिल्ह्य़ातील सिरोंचा तालुक्यातील १८०.७२ चौरस किमीच्या रानम्हशींच्या कोलामार्का संवर्धन क्षेत्राच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. सातपुडा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रीय वन्यजीव मंडळाचे सदस्य किशोर रिठे गेल्या १३ वर्षांपासून कोलामार्का रानम्हशी अभयारण्यासाठी प्रयत्नरत होते, परंतु कोलामार्काला संवर्धन क्षेत्राचाच दर्जा देण्याचा निर्णय घेऊन राज्य सरकारने मंगळवारी अधिसूचना जारी केली.
कोलामार्काचा परिसर संव्   ोर्धन क्षेत्र म्हणून जाहीर झाल्याने अतिदुर्मीळ वन्यजीव प्रजाती असलेल्या रानम्हशींचे आता चांगल्या तऱ्हेने संवर्धन होऊ शकेल, असा विश्वास किशोर रिठे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केला. यासंदर्भातील अधिसूचना सरकारने जारी केली असली तरी १८०.७२ चौरस किमीच्या संवर्धन क्षेत्रापैकी १०० चौरस किमीचा परिसर रानम्हशी अभयारण्य म्हणून जाहीर केला जावा, या मागणीवर किशोर रिठे अद्याप आग्रही आहेत. पुण्यातील बैठकीत त्यांनी रानम्हशींच्या पर्यावरणीय महत्त्वाकडे लक्ष वेधतानाच कोलामार्का परिसराला अभयारण्याचा दर्जा देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.
कोलामार्का परिसर गडचिरोली जिल्ह्य़ातील नक्षलग्रस्त सिरोंचा तालुक्यातील कमलापूर वनक्षेत्रात असून या ठिकाणी मूळ भारतीय प्रजातीच्या १८ रानम्हशी अस्तित्वात आहेत. मुख्य वन्यजीव संरक्षकांनी हा परिसर रानम्हशी संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्याला वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
उल्लेखनीय म्हणजे गेल्यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात नागपुरात सातपुडा फाऊंडेशन, वाइल्ड लाइफ ट्रस्ट ऑफ इंडिया आणि आययूसीएनच्या वतीने संयुक्तपणे रानम्हशी संवर्धनावर आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केल्यानंतर या दुर्मीळ वन्यजीव प्रजातीच्या संवर्धनाकडे देशाचे लक्ष वेधले गेले होते. कोलामार्का हा नक्षलप्रभावित क्षेत्राचा भाग असल्याने वन अधिकाऱ्यांना या भागात मोठय़ा समस्यांचा सामना करावा लागत आहे, परंतु अहेरी तालुक्यातील गोविंदगाव येथे नक्षलवाद्यांनी गावकऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत वन्यजीव वाचविण्याचे आवाहन केल्याने वन खात्याला दिलासा मिळाला आहे.

First Published on January 31, 2013 5:34 am

Web Title: jungle buffilow got rightfull home in gadchiroli