दामदुप्पट, तिप्पट करून देण्याचे आमिष दाखवून ग्राहकांना फसविल्याप्रकरणी केबीसी कंपनीच्या १८ संचालकांसह मुख्य एजंटावर कळमनुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
केबीसी मल्टीस्टेट कंपनीत रक्कम गुंतवून दुप्पट, तिप्पट फायदा देण्याच्या नावाखाली केबीसीने जिल्ह्यात सर्वत्र जाळे विणले होते. विशेष म्हणजे कोटय़वधीची फसवणूक झाल्यानंतरही या कंपनीविरोधात उघड तक्रार करण्यास ग्राहक पुढाकार घेत नसल्याचे चित्र आहे. आपसातील नातेसंबंध आड येत असल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे बोलले जाते. कळमनुरी व िहगोली पोलिसांत आतापर्यंत या कंपनीच्या संचालकांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले. मात्र, फसवणुकीचा हा प्रकार नाशिकशी संबंधित असल्यामुळे दाखल गुन्हे नाशिक पोलिसांकडे वर्ग केले जात आहेत.
केबीसी कंपनीत ८६ हजार रुपये गुंतवण्यास भाग पाडून तिप्पट करण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी वाकोडी (तालुका कळमनुरी) येथील शिवाजी भवर यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळमनुरी पोलिसांत केबीसीचा संचालक भाऊराव चव्हाण, आरती चव्हाण, बापूसाहेब चव्हाणसह १८ संचालक, तसेच केबीसीचा मसोड येथील मुख्य एजंट रुस्तुम कुंडलिकराव माहोरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.