मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मार्च २०२२ मध्ये दहावीची परीक्षा दिली होती. या परिक्षेत त्यांचे राहिलेले दोन विषय त्यांनी सोडविले असून आता ते दहावीत उत्तीर्ण झाले आहेत. ही आनंदाची बातमी देत असताना ते म्हणाले की, आपण पुढील शिक्षण निवडणुकीनंतर पूर्ण करणार आहोत. यावेळी आपल्याला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत असून, केलेल्या कामाच्या विश्वासावर जनता तिसऱ्यांदा आपल्याला संधी देईल, असेही बारणे म्हणाले. श्रीरंग बारणे हे ६० वर्षांचे असून शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले आहे.
म्हणून मी दहावीच्या परीक्षेला बसलो
खासदार बारणे हे ६० वर्षांचे असून, मार्च २०२२ मध्ये त्यांनी चिंचवड येथील श्री फत्तेचंद जैन विद्यालय येथून त्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. या परीक्षेत त्यांचे दोन विषय राहिले होते. ते त्यांनी नुकतेच सोडवले आहेत. माध्यमांशी संवाद साधत असताना श्रीरंग बारणे म्हणाले की, माझ्यासारखे अनेक लोक वयाची तमा न बाळगता शिक्षण घेत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नुकतीच डॉक्टरेट मिळवली. राजकारणातील प्रत्येक माणूस ध्येयवादी असतो. त्याला प्रत्येक गोष्ट शिकण्याची, जाणून घेण्याची इच्छा असते. त्याप्रमाणे मीही शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. शिक्षण घेण्याबरोबरच चार पुस्तकांचे लिखाणही केले आहे. शब्दवेध, लढवय्या, मी अनुभवलेली संसद आणि माझा वैभवशाली मावळ ही चार पुस्तके मी लिहिलेली आहेत. मला वाचन आणि लेखनाची आवड आहे. त्यामुळेच मी दहावीची परीक्षा दिली होती.
मावळ : श्रीरंग बारणे अब्जाधीश; नेमकी किती आहे संपत्ती…६०व्या वर्षी दिली दहावीची परीक्षा
श्रीरंग बारणे अब्जाधीश उमेदवार
श्रीरंग बारणे यांनी नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत निवडणुकीचा अर्ज भरला. यावेळी अर्जासह दिलेल्या शपथपत्रात त्यांनी १३२ कोटी २३ लाख ९१ हजार ६३१ रुपयांची त्यांची मालमत्ता जाहीर केली आहे. २०१९ साली बारणे कुटुंबाने १०२ कोटी ८१ लाख १० हजार रुपयांची मालमत्ता दाखविली होती. पाच वर्षांत २९ कोटी ४२ लाख ८१ हजार ४९७ रुपयांनी मालमत्तेत वाढ झाली आहे.
बारणे यांच्याकडे मर्सिडीझ बेंझ आणि टोयाटो फॉर्च्युनर या दोन मोटारी आहेत. त्यांच्याकडे हिऱ्याची ११ लाख ५५ हजारांची एक अंगठी, तर ३२ लाख ५० हजारांचे ४७० ग्रॅम सोने आहे. ३५ हजारांचे एक वेब्ली अँड स्कॉट बनावटीचे रिव्हॉल्व्हरही आहे. तर पत्नी सरिता यांच्याकडे पाच लाख ५० हजारांच्या कर्णकुड्या, ५१ लाखांचे ७४३ ग्रॅम सोने आहे. बारणे यांच्यावर ४४ लाखांचे वाहन आणि वेगवेगवेळ्या संस्थांचे ४१ लाख असे एकूण ८५ लाखांचे कर्ज आहे.