केज नगर पंचायत निवडणुकीत कॉंग्रेस खासदार रजनी पाटील आणि माजी मंत्री अशोक पाटील यांच्या पॅनेलला सर्वाधिक जागा मिळवण्यात सोमवारी यश मिळाले. या पॅनेलला आठ जागांवर विजय मिळवला. त्याचवेळी भाजपची या निवडणुकीत पिछेहाट झाली आहे. भाजपच्या पॅनेलला पाच जागांवर विजय मिळाला असून, एका ठिकाणी भाजप बंडखोर उमेदवाराला यश मिळाले आहे. केज नगर पंचायतीच्या एकूण १७ जागांसाठी रविवारी मतदान झाले होते. त्याची मतमोजणी सोमवारी झाली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पॅनलला दोन जागांवर यश मिळाले असून, एका ठिकाणी त्यांचा बंडखोर उमेदवार विजयी झाला आहे. केजसह बीड जिल्ह्यातील पाच मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहेत. त्याचबरोबर पंकजा मुंडे यांच्याकडे राज्यात ग्रामविकास हे महत्त्वाचे खाते आहे. तरीही केज नगर पंचायत निवडणुकीत भाजपला विजय मिळवता आला नाही. अंतर्गत गटबाजीमुळेच या निवडणुकीत भाजपच्या पॅनेलचा पराभव झाल्याचे बीडमधील राजकीय अभ्यासकांचे मत आहे. गेल्या अडीच वर्षांपासून कॉंग्रेसचे आदित्य पाटील हे या पंचायतीचे नेतृत्त्व करीत आहे.