रायगड जिल्ह्यत पंतप्रधान आवास योजना तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेची कामे त्वरित हाती घ्यावीत, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्री. किरण पाटील यांनी गुरुवारी (ता.२६) जिल्ह्यतील सर्व गटविकास अधिकारी तसेच खातेप्रमुख बैठकीत दिल्या आहेत. याचबरोबर विविध विभागांमधील सुरू असलेल्या कामांचा आढावा त्यांनी यावेळी घेतला.

रायगड जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांची आढावा बैठक डॉ. श्री. किरण पाटील यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता.२६) जिल्हा परिषदेच्या टिपणीस सभागृहात पार पडली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रणधीर सोमवंशी, सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नितीन मंडलिक, ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौ. शीतल पुंड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. दत्तात्रेय पाथरुट यांच्यासह जिल्हा परिषद विविध विभागांचे अधिकारी, पंचायत समिती गट विकास अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.

या बैठकीत सर्व योजनांचा आढावा घेण्यात आला. प्रत्येक योजनेत जिल्ह्यला देण्यात आलेले उद्दिष्ट त्यानुसार जिल्ह्यत पूर्ण करण्यात आलेली कामे व प्रगतीपथावर असलेली कामे यांची संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. तसेच उर्वरित कामे नियोजित वेळेत पूर्ण करावीत असे निर्देश संबंधितांना देण्यात आले.

या बैठकीत रायगड जिल्ह्यत पंतप्रधान आवास योजनेची कामे त्वरित हाती घ्यावीत, या योजनेतंर्गत घरकुलांचे बांधकाम करताना मनरेगा अंतर्गत मजुरांना कामे उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे, अशी सूचना करण्यात आली. रायगड जिल्ह्यत शासनाकडून करण्यात आलेल्या सामाजिक व आर्थिक स्तर सर्वेक्षणानुसार घरकुलांचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यत २५ फेब्रुवारी २०२१पर्यंत पण २ हजार २२३ घरकुलांचे बांधकाम करण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषदेने नजरेसमोर ठेवले आहे. त्यानुसार ग्रामीण भागात गवंडी प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच पुढील टप्प्यातील कायम स्वरुपी प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांचे आधरसिडींग करण्याचे काम १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच या योजनेतंर्गत पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांनी आपले प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.