प्रबोध देशपांडे

राज्यातील तीन पक्षांच्या सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षीय भाजपलाही धक्का देणारा निकाल अमरावती शिक्षक मतदारसंघात लागला. राजकीय पक्ष व प्रमुख शिक्षक संघटनांना बाजूला सारत अमरावती विभागातील शिक्षकांनी वाशीमचे अ‍ॅड.किरण सरनाईक यांना संधी दिली. नियोजनबद्धरीत्या निवडणूक लढून प्रस्थापितांवर मात केली. शिक्षक मतदारांना गृहीत धरणे श्रीकांत देशपांडे यांना भोवले आहे.

vasai, virar, palghar, lok sabha election 2024, Hitendra Thakur
सर्व पक्षांनी मलाच पाठिंबा द्यावा, हितेंद्र ठाकूर यांची चित्रफित प्रसारित
dewendra fadanvis
आमचा प्रवक्ताही चर्चेत पाणी पाजेल…; फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना…
I experienced a golden age in advocacy asserted Justice Bhushan Gavai
‘‘वकिली करताना मी सुवर्ण काळ अनुभवला,” न्यायमूर्ती भूषण गवई यांचे प्रतिपादन; म्हणाले, “नवोदित वकिलांनी…”
girish mahajan statement on bjp mp unmesh patil
खासदार उन्मेश पाटील यांना चुकीची जाणीव होईल; गिरीश महाजन यांचा सूचक इशारा

शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत होण्याचा अंदाज होता. अमरावती शिक्षक मतदारसंघात मात्र हा अंदाज साफ खोटा ठरला. २७ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. ८६.७३ टक्के विक्रमी मतदान झाले. ते सरनाईक यांच्या पथ्यावर पडले. ही निवडणूक डोळय़ापुढे ठेवून सरनाईक यांनी गत दोन ते अडीच वर्षांपासून तयारी सुरू केली होती. या मतदारसंघात अमरावती जिल्हय़ात सर्वाधिक मतदार. त्यामुळे बहुतांश उमेदवारांचा जोर हा अमरावती जिल्हय़ावर अधिक असतो.

संपर्कावर भर

सरनाईक यांनी वाशीम, यवतमाळ जिल्हय़ांवर लक्ष केंद्रित करून बांधणी केली. अनुदानित मोठय़ा शाळांऐवजी लहान विनाअनुदानित शाळा जोडण्यावर त्यांनी भर दिला. काही शाळांना स्वखर्चातून त्यांनी साहित्य दिले. संस्थाचालक म्हणून शिक्षक क्षेत्रातील अडचणींची जाण असली तरी शाळांना भेटी देताना शिक्षक व शाळांच्या समस्या जाणून घेतल्या. असंघटित व विस्थापित मतदारांचे त्यांनी जाळे विणले. अमरावती विभागातील प्रत्येक तालुक्यात त्यांचे किमान १० समर्थक शिक्षकांच्या कायम संपर्कात राहिले. मतदारसंघातील जातीय समीकरणेही त्यांनी योग्य पद्धतीने हाताळून त्याचा लाभ करून घेतला.

महाविकास आघाडी व भाजप उमेदवारांच्या बाबतीत त्या उलट दिसून आले. राजकीय पक्षांच्या उमेदवारांची प्रचार यंत्रणा संपूर्णत: विस्कळीत होती. श्रीकांत देशपांडे यांच्याबाबतीत शिक्षकांमध्ये सुरुवातीपासून नाराजी होती. सहा वर्षांअगोदर निवडून येण्यासाठी श्रीकांत देशपांडे यांनी शिक्षक आघाडीच्या झेंडय़ाखाली संघटन बांधणी करून खूप श्रम घेतले. त्यावेळी ऊर्दू शिक्षकांचे एकगठ्ठा मतदानही त्यांच्या पारडय़ात पडले. आमदारकीच्या कार्यकाळात शैक्षणिक प्रश्नांकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याने शिक्षकांमध्ये रोष होता. निवडणुकीसाठी वर्षभरापासून ते पुन्हा सक्रिय झाले. शिवसेनेच्या कोटय़ातून महाविकास आघाडीची उमेदवारी पदरात पाडून घेतली. समोर कुणीही लढतीत दिसत नसल्याने ते निश्चिंत होते. याच ठिकाणी त्यांचा घात झाला. घटक पक्षातील काहींनी दगाफटका केल्याचाही आरोप होत आहे. भाजप लढतीत राहील असे चित्र असताना त्यांच्या उमेदवाराला पहिल्या पाचमध्येही स्थान मिळवता आले नाही. शेखर भोयर यांची खूप अगोदरपासून तयारी सुरू असल्याने त्यांनी तिसऱ्या क्रमांकाची मते घेऊन लक्ष वेधले. अमरावती जिल्हय़ात संगीता शिंदे, तर पश्चिम वऱ्हाडातील अकोला, बुलढाणा जिल्हय़ात विज्युक्टाचे डॉ.अविनाश बोर्डे व अपक्ष उमेदवार डॉ.नीलेश गावंडे यांनी दखलपात्र मते घेतली. अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलेली विमाशि संघटना अंतर्गत वादामुळे अदखल पात्र राहिली. प्रमुख आठ उमेदवारांमधील मतविभाजनही सरनाईक यांच्या पथ्यावर पडले.

अ‍ॅड.किरण सरनाईकांची काँग्रेसची पार्श्वभूमी

विधान परिषदेच्या माजी आमदार स्व.मालतीताई सरनाईक यांचे अ‍ॅड.किरण सरनाईक हे पुत्र आहेत. अकोला-वाशीम संयुक्त जिल्हा असताना ते जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. अ‍ॅड. किरण हे वाशीम येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत. यामुळेच त्यांच्या विजयात अनेकांचा मदतीचा ‘हात’ मिळाल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षातील मोठे नेते सरनाईक यांचे जवळचे नातेवाईक आहेत. विभागातील अनेक मोठय़ा संस्थांनी तटस्थ राहण्याची भूमिका जाहीर केली तरी कुठला उमेदवार चांगला याचे संदेश वितरित केले गेले होते.

मतदारसंघावर संघटनांचे वर्चस्व

अमरावती शिक्षक मतदारसंघात गेल्या ३६ वर्षांपासून राजकीय पक्षांना स्थान मिळाले नाही. १९८४ मध्ये हा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून यावर शिक्षक संघटनांचेच वर्चस्व आहे. या मतदारसंघातून विमाशिचे उमेदवार तीन वेळा, शिक्षक परिषद व शिक्षक आघाडीचे उमेदवार प्रत्येकी एक वेळा निवडून आले. आता निवडून आलेले अ‍ॅड.किरण सरनाईक हेसुद्धा अमरावती विभागीय शिक्षक संघाचे अध्यक्ष आहेत.

‘पैठणी पॅटर्न’ची चर्चा रंगली

अमरावती शिक्षक मतदारसंघातील प्रचारादरम्यान पैठणी वाटपाच्या आरोपावरून सरनाईक यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचे काही गुन्हे दाखल झाले. पैठणीच्या मुद्दय़ावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. शैक्षणिक व राजकीय वर्तुळात ‘पैठणी पॅटर्न’ची जोरदार चर्चा राज्यभर रंगली आहे.

* सरनाईक यांनी वाशीम, यवतमाळ जिल्हय़ांवर लक्ष केंद्रित करून बांधणी केली. अनुदानित मोठय़ा शाळांऐवजी लहान विनाअनुदानित शाळा जोडण्यावर त्यांनी भर दिला.

* काही शाळांना स्वखर्चातून त्यांनी साहित्य दिले. अमरावती विभागातील प्रत्येक तालुक्यात त्यांचे किमान १० समर्थक शिक्षकांच्या कायम संपर्कात राहिले.

* मतदारसंघातील जातीय समीकरणेही त्यांनी योग्य पद्धतीने हाताळून त्याचा लाभ करून घेतला. दुसरीकडे  राजकीय पक्षांच्या उमेदवारांची प्रचार यंत्रणा संपूर्णत: विस्कळीत होती.