पांढरकवडा शहरात दिवसागणिक करोना रूग्णांमध्ये मोठी वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाने शहरात ठिकठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे. या प्रतिबंधामुळे शहरवासियांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची आगपाखड करीत शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी आज शहरातील मुख्य बाजारपेठेत रस्त्यावर झोपून आंदोलन केले.

पांढरकवडा शहरातील करोनाबाधितांची संख्या शंभरावर पोहचली आहे. त्यामुळे या शहरात प्रशासनाने संचारबंदीसह कठोर टाळेबंदी लागू केली. ठिकठिकाणी अडथळे लावून अनेक भाग प्रतिबंधित केले. प्रशासन टाळेबंदीचा अतिरेक करीत असल्याचा आरोप करीत या विरोधात किशोर तिवारींनी दोन दिवसांपासून मोहीम उघडली. रविवारी शहरातील एका भागातील लाकडी अडथळे तिवारी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी उखडून फेकल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, आज सोमवारी सकाळी तिवारी यांनी शहरातील मुख्य बाजारपेठेत रस्त्यावर झोपून आंदोलन केले. गेल्या चार महिन्यांपासून टाळेबंदीच्या नावाखाली पोलीस व प्रशासन नागरिकांवर अत्याचार करीत आहेत. बाजारपेठ बंद असल्याने व्यावसायिकांचा प्रश्न गंभीर बनला आहे. शासनाच्या मार्गदर्शकतत्वांना तिलांजली देऊन प्रशासन मनमानी कारभार करीत असल्याने नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत, असा आरोप तिवारी यांनी केले आहे.

प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेऊन शहरातील प्रतिबंधित भाग कसे कमी करता येईल आणि बाजारपेठ कशी सुरू करता येईल याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन तिवारी यांना दिले. किशोर तिवारींच्या या आंदोलनामुळे मुख्य बाजारपेठेत बघ्यांची गर्दी उसळली होती. यासाठी पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याचा उपयोग झाला नाही. तिवारी यांनी रस्यावरच जेवण घेतले. त्यांना ऊन लागू नये म्हणून कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर छत्र्या धरल्या होत्या. यादरम्यान काही कार्यकर्त्यांनी त्यांचे पायसुद्धा चेपून दिले.