गणेशोत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्‍यांना १४ दिवस होम क्‍वारंटाइन रहावे लागणार आहे. कोकणामधील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील प्रशासनाने यासंदर्भातील सूचना जारी केल्या आहेत. त्यामुळेच ७ ऑगस्टपूर्वी गावी जाण्यासाठी चाकरमान्यांचे प्रयत्न आहेत. मात्र गणेशोत्सवासाठी गावी जाण्याच्या तयारीत असणाऱ्या चाकरमान्यांच्या वाटेत दरडरुपी संकट उभं राहिलं आहे. गोव्यात पेडणे बोगद्यात दरड कोसळल्याने कोकण रेल्वेच्या मार्गावरील दक्षिण भारतात जाणाऱ्या गाड्या मिरजमार्गे वळवण्यात आल्या आहेत. त्यामुळेच आता कोकणात जाण्याच्या तयारी असणाऱ्या चाकरमान्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

कोकण रेल्वे मार्गावर पेडणे बोगद्यात दरड कोसळल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे गणेश चतुर्थीनिमित्त येणार्‍या चाकरमान्यांचे हाल होणार आहेत. ही दरड कोसळल्यामुळे एर्नाकुलम निजामुद्दीम सुपरफास्ट स्पेशल एक्सप्रेस, थिरुवंतनपुरम सेंट्रल लोकमान्य टिळक स्पेशल एक्सप्रेस, राजधानी स्पेशल एक्सप्रेस, निजामुद्दीम एर्नाकुलम एक्सप्रेस व लोकमान्य टिळक थिरुवंतनपुरम सेंट्रल एक्सप्रेस या गाड्या पनवेल- पुणे- मिरज- लोंडा मार्गे मडगाव अशा वळविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा निर्णय घेण्यात आल्याने नेत्रावती आणि मंगला एक्स्प्रेसने कोकणात येणाऱ्या चाकरमानींची मोठी गैरसोय होणार आहे. ट्रॅकवरच मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याने ती बाजूला करण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळेच वाहतूक पूर्ववत होण्यासाठी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर ७ तारखेपर्यंत कोकणामध्ये पोहचणे आवश्यक आहे. त्यामुळेच आता या मार्गाने गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्यांना पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे.

मुंबई, पुण्यासह जिल्ह्य़ाच्या  बाहेरून येणाऱ्या चाकरमान्यांना ७ ऑगस्ट पूर्वी रायगड जिल्ह्य़ात दाखल व्हावे लागणार आहे. त्याचबरोबर त्यांना पुढचे १४ दिवस होम विलगीकरणात राहावे लागणार आहे. रायगडच्या् जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी खास गणेशोत्सावासाठी ज्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत त्यामध्ये याचा समावेश आहे. राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी घालून दिलेल्या नियमांच्या अधीन राहून रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आज रायगड जिल्ह्य़ासाठी परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार घरी विलगीकरणाबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. घरी विलगीकरण आदेशच्या अंमलबजावणीची जबाबदारी ही करोना प्रतिबंधक समिती व सरपंच यांची राहील. रायगड जिल्ह्य़ात १५ हजारांच्या  आसपास नागरिकांना करोनाची लागण झाली आहे. जिल्ह्य़ासह राज्यात करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा असे आवाहनदेखील करण्यात आले आहे.