भाजपाला फायदा होणार नाही अशी व्यूहरचना आखून देशातील विरोधक आगामी निवडणुका लढवतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी दिली. एखाद्या राज्यात जो पक्ष जास्त प्रभावी आहे, त्याच्या नेतृत्वाखाली लढत दिली पाहिजे, असे सूचक विधान करत शरद पवारांनी काँग्रेसला आघाडीबाबतचा मोलाचा सल्लादेखील दिला.

सोमवारी शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि अन्य विरोधकांची भूमिका काय असेल, याबाबत सविस्तर भाष्य केले. ते म्हणाले, पुढील सर्व निवडणुका काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्रित लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये विरोधकांना सामावून घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. मात्र, निवडणुकीला सामोरे जाताना काही भूमिका निश्चित केली पाहिजे. त्यासाठी एखाद्या राज्यात जो पक्ष जास्त प्रभावी आहे, त्याच्या नेतृत्वाखाली लढत दिली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. पवार यांनी पश्चिम बंगाल आणि ओदिशा या राज्यांचे दाखले दिले. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस तर ओदिशात नवीन पटनायक यांचा प्रभाव जास्त असल्याने तिथे इतर पक्षांनी त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवावी, असे सांगत काही राज्यात काँग्रेस पक्षाला थोरला भाऊ होण्याचे टाळले पाहिजे, असे स्पष्ट संकेत पवार यांनी दिले.

निवडणुकांमध्ये भाजपाविरोधक एकत्र आले की भाजपाचा पराभव होतो, हे उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत दिसले. याशिवाय गेल्या दहापैकी आठ मतदारसंघात विरोधकांची सरशी झाली आहे, याकडे लक्ष वेधून पवार यांनी आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला कोणत्याही प्रकारचा फायदा घेऊ द्यायचा नाही हा व्यूहरचनेचा गाभा असेल, असे ते म्हणाले.