कासू ते नागोठणे रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे तांत्रिक व इतर महत्त्वपूर्ण कामासाठी मध्य रेल्वेने या मार्गावरील रेल्वे वाहतूक सेवा पाच तास बंद ठेवली होती. या मेगा ब्लॉकमुळे मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेची सेवा विस्कळीत झाली.

बुधवारी दुपारी बारा पन्नास ते सायंकाळी पाच पन्नासदरम्यान नागोठणे-कासू रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. याचा कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या अप आणि डाऊन मार्गावरील गाडय़ांना बसला. मुंबईकडे येणाऱ्या आणि कोकणात जाणाऱ्या बहुतांश गाड्या विलंबाने धावत होत्या. यात प्रामुख्याने १२१४१ राजधानी एक्सप्रेस, १२६१८ मंगला एक्सप्रेस, ५०१०५ दिवा सावंतवाडी पॅसेंजर १२४४९ गोवा संपर्कक्रांती एक्स्प्रेस या गाडय़ा उशिराने धावत होत्या. त्यामुळे ठिकठिकाणच्या स्टेशन्सवर प्रवाशी अडकून पडले होते.
अप मार्गावरील दिवा-रोहा डेमू पॅसेंजर (७१०८९) ही स. ९.१० मिनिटांनी सुटणारी गाडी कासू स्टेशनपर्यंत चालविण्यात आली, तर रोहा डेमू पॅसेंजर (७१०९६) ही गाडी कासू येथून दु ४.१० मिनिटांनी सोडण्यात आली.
डाऊन मार्गावरील ११.४५ ला सुटणारी लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते थिरुवनंतपुरम नेत्रावती एक्स्प्रेस दु. २.२० मिनिटांनी सोडण्यात आली, तर ११.०५ मिनिटांनी सुटणारी मुंबई-मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस (१०१११) सीएसटीहून बुधवारी रा. १२.३० मिनिटांनी सोडण्यात आली.
अप मार्गावर थिरुवनंतपुरम-मुंबई नेत्रावती एक्स्प्रेस (१६३४६) नियमित वेळेपेक्षा ५ तास उशिराने, तर मडगाव-सीएसटी मांडवी एक्स्प्रेस (१०१०४) सुमारे तीन तास उशिराने सीएसटीला दाखल होणार असल्याचे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने आधीच जाहीर केले होते.