कोकणातील उंच-सखलपणामुळे पावसाचे पाणी वाहून जाते. त्याचे पुढील तीन वर्षांत नियोजन करून टँकरमुक्त कोकण करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यात युतीचीच सत्ता येईल असे ते म्हणाले. मच्छीमारी एलईडीबंदी शासन आणत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला

कणकवली येथील भाजपच्या महाजनादेश यात्रेत पाच तास उशिराने ते सभास्थळी दाखल झाले. या वेळी शिक्षणमंत्री आशीष शेलार, मंत्री विनोद तावडे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हा अध्यक्ष प्रमोद जठार, आमदार प्रसाद लाड, राजन तेली, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार प्रवीण दरेकर, किरीट सोमय्या, संदेश पारकर, अतुल रावराणे, अतुल काळसेकर, कोकण संघटनमंत्री सतीश  धोम्ड व पदाधिकारी उपस्थित होते.

कोकणात कोसळणाऱ्या पावसाचे पाणी वाहून जाते. ते अडवण्याचा पुढील तीन वर्षांत एक आराखडा बनवून कोकण टँकरमुक्त करण्यात येणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

मच्छीमार दुष्काळाबाबतदेखील दिलासा दिला. एलईडी मच्छीमारीवर बंदी आणली जाईल, अशी ग्वाही दिली. चांदा ते बांदा योजनेतूनदेखील रोजगारनिर्मितीवर भर दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. आंबा-काजू प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याचेदेखील त्यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा आहे. या पर्यटन जिल्ह्यामध्ये पर्यटनासाठी पायाभूत सुविधा आणि प्रकल्प उभारले जातील. त्यातून रोजगारनिर्मिती होईल असे ते म्हणाले.  शिक्षणात आमूलाग्र बदल होत असून महाराष्ट्र देशात क्रमांक १ चा होईल. राज्यातील खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील १ लाख विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांमध्ये आल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी मी जनादेश यात्रा काढली आहे, सत्तेत नव्हतो त्या वेळी संघर्षयात्रा तर सत्तेत असताना संवाद यात्रा काढली आहे. संवाद यात्रेला सभागृहात जागा मिळत नाही, तर विरोधकांच्या खुच्र्या रिकाम्या असतात, असा टोला त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या यात्रांचा नामोल्लेख करत हाणला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सर्वागीण विकास साधला जात असून सर्वच स्तरांतून महाराष्ट्र क्रमांक एकवर आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मागील पाच वर्षांत केलेल्या कामांचा आढावा घेताना त्यांनी आरोग्य, शिक्षण आधी विषयांचा ऊहापोह करत रोजगारनिर्मितीत महाराष्ट्राने आघाडी घेतली असून देशात महाराष्ट्र रोजगारनिर्मितीत प्रथम येण्यासाठी आमच्या सरकारचे प्रयत्न असल्याची ग्वाही दिली.

राज्यात पंधरा वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळातील आणि आम्ही पाच वर्षांत सत्तेच्या काळात केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडल्यास आम्ही सर्वागीण विकास केल्याचे दिसून येईल, असेदेखील मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

आघाडी सरकारने शेतकऱ्यांना पंधरा वर्षांत २० हजार कोटी तर आम्ही पाच वर्षांत पन्नास हजार कोटींची मदत केली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचा समाचार घेत त्यांच्या सत्ताकाळातील कामांवर प्रहार केला. या वेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी प्रास्ताविक केले.

दरम्यान, खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पटवर्धन नाका येथे आपल्या कार्यालयासमोर स्वागत केले. या वेळी आमदार नितेश राणे, नीलेश राणे व  स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. आपला भाजप प्रवेश मुंबईत होईल, असे राणे म्हणाले. तसेच आमदार नितेश राणे भाजप चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले.