भीमा कोरेगाव येथील दंगली प्रकरणी आज पोलिसांनी चळवळीतील पाच कार्यकर्त्यांना अटक केली ती बाब निषेधार्थ असून कोणतेही पुरावे नसताना पुणे पोलिसांनी कोणत्या आधारे कारवाई केली? असा सवाल एल्गार परिषेदेचे संयोजक आकाश साबळे आणि जोती जगताप यांनी विचारला. संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना वाचवण्यासाठी या चौघांना सरकारने अटक केली असा आरोप त्यांनी यावेळी केला.

पुण्यात आयोजित एल्गार परिषदेचे आयोजक आणि दलित लेखक सुधीर ढवळे यांना त्यांच्या मुंबईतील गोवंडी येथील घरातून पुणे पोलिसांकडून पहाटे अटक करण्यात आली. त्याचबरोबर वकिल सुरेंद्र गडलिंग आणि महेश राऊत यांना नागपूरातून तर रोना विल्सन यांना दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज पुण्यात रमेश गायचोर,सिद्धार्थ दिवे,किशोर कांबळे,आकाश साबळे,इब्राहम खान आणि सागर गोरखे यांनी पत्रकार परिषदेत भूमिका मांडली.

यावेळी एल्गार परिषदेचे संयोजक आकाश साबळे म्हणाले की, भीमा कोरेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोगाची स्थापना केली आहे. त्याचा अहवाल आल्यावर कारवाई होणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. तो आदेश देऊन अजून महिन्याभराचा कालावधी झाला नाही किंवा अद्यापपर्यंत तो अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेला नाही. त्यामुळे आज ज्या प्रकारे मुंबई, नागपूर आणि दिल्लीमधून चळवळीतील चार कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी अटक केली.

कोणाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली, हे स्पष्ट करण्याची गरज असून जर मुख्यमंत्री अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाई होणार अशी एका बाजूला घोषणा करतात. दुसऱ्या बाजूला पोलीस कार्यकर्त्यांना घरी जाऊन अटक करतात. या कारवाईमधून मुख्यमंत्री तरी खोटे बोलत असावेत किंवा पोलीस मुख्यमंत्र्याचे ऐकत नसावेत अशा शब्दात मुख्यमंत्र्यावर त्यांनी निशाणा साधला.

ते पुढे म्हणाले की, येत्या दोन दिवसात राज्यातील आंबेडकरवादी संघटनांची बैठक घेऊन ज्या व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या सुटकेसाठी राज्यभर लढा उभारणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. यावेळी ज्योती जगताप म्हणाल्या की,भीमा कोरेगाव दंगलीप्रकरणी एल्गार परिषदेच्या कार्यकर्त्यांवर हे सरकार अन्याय करताना दिसत आहे.

मागील पाच महिन्यापासून कार्यकर्त्यांच्या घरी छापे मारले जात आहे. याचे कोणतेही आदेश नसताना ही कारवाई केली जात आहे. या प्रकरणातील संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना वाचवण्यासाठी हा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला तर आज ज्या प्रकारे चळवळीतील कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली ती निषेधार्थ बाब आहे. या चौघांना अटक करून त्यांना नक्षलवादी संघटनेशी संबध असल्याचे समाजासमोर दाखवण्याचे काम सरकार करीत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.