उस्मानाबादमधील शेतीला बिहारींची राखण; राज्यातील शेतीत नवा पायंडा

मराठवाडय़ातला काही जिल्ह्य़ांत पीक बहरात आले की, मजुरांची वानवा जाणवते. औरंगाबाद जिल्ह्य़ात कापूस बहरात होता तेव्हा मध्य प्रदेशातून मजूर आणावे लागले. बोंडअळी आली आणि ते मजूर परत गेले. दूध व्यवसायात पाय रोवू पाहणाऱ्या हरियाणातल्या म्हशी सांभाळण्यासाठीही उत्तर प्रदेशातून मजूर आणले जातात. काही वेळा हरियाणातील म्हशी सांभाळण्यासाठी तेथील मजूरही राज्यात येतात. उस्मानाबाद जिल्ह्य़ात आता द्राक्षबागांसाठी बिहारच्या मजुरांना बोलावण्यात आले आहे. तुळजापूर तालुक्यातील जळकोटवाडी येथील त्र्यंबक आप्पाराव फंड या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याने बिहारहून बाग जोपासण्यासाठी मजूर आणले आहेत. कारण त्यांच्या ६० एकर द्राक्षबागेत २० प्रकारचे वाण त्यांनी लावले आहेत आणि त्यांची वार्षिक उलाढाल कोटय़वधी रुपयांची आहे.

मागील चार दशकांपासून जगाच्या कानाकोपऱ्यात द्राक्षांची निर्यात करणाऱ्या त्र्यंबक फंड यांचे प्रयत्न थक्क करायला लावणारे आहेत.

दोन एकर क्षेत्रापासून द्राक्ष बागायतीला सुरुवात करणाऱ्या त्र्यंबक फंड यांच्या प्रयत्नांचा वेल आता तब्बल साठ एकराहून अधिक क्षेत्रावर पोहचला आहे. महाराष्ट्रातून विदेशात द्राक्षांची निर्यात करणारे आपण पहिले शेतकरी असल्याचा दावा ते अभिमानाने करतात. सध्या त्यांच्या शेतात दररोज दीडशेहून अधिक मजूर काम करत आहेत. सकाळी सहा वाजता सुरु झालेली लगबग रात्री बारा वाजेपर्यंत सुरु असते. बिहारहून आलेले पन्नास मजूर साठ एकर बाग सांभाळत आहेत.

गावातले मजूर तेवढेच काम करतात किंबहुना त्यांच्याकडून अधिक काम होऊ शकते. परंतु येण्या-जाण्याचा वेळ आणि मधल्या सुटीचा वेळ अधिक असल्यामुळे बिहारच्या मजुराकडून अधिक काम होते. ते तेथेच राहतात. दुसरे कोणतेही मनोरंजनाचे साधन नसल्यामुळे आणि घरीही जायचे नसल्यामुळे अगदी उशिरापर्यंत ही मंडळी काम करतात. त्यामुळे अधिक फायदा होतो, असे फंड सांगतात.

वडिलोपार्जति केवळ बारा एकर जमीन असलेल्या फंड यांनी मागील तीस वर्षांत केवळ द्राक्षबागेच्या नफ्यातून सव्वाशे एकर जमीन नव्याने खरेदी केली आहे. अडीच कोटी लिटर क्षमतेचे तीन आणि चार कोटी लिटर क्षमतेचे एक शेततळे या सर्व बागांना पाणीटंचाईच्या काळात नवसंजीवनी देण्याचे काम करतात. या शेततळ्यांबरोबरच त्यांनी तब्बल ११० िवधनविहिरी वेगवेगळ्या ठिकाणी घेतल्या आहेत. याव्यतिरिक्त तीन मोठय़ा विहिरींमधून पाणीउपसा केला जातो. हे सर्व पाणी तीस लाख लिटर क्षमता असलेल्या एका हौदात जमा केले जाते. तेथून आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा पुरवठा केला जातो. मूबलक पाणी उपलब्ध असल्यानंतर अडचणी येत नाहीत. मात्र, दर दोन-तीन वर्षांला निसर्गाचे चक्र अनेक समस्या निर्माण करत आहे. २०११-१२ आणि त्यानंतर २०१५-१६ या सालात दुष्काळाने द्राक्षबागेला घेरले होते. तेव्हा टँकरने पाणी विकत आणून लहान मुलाप्रमाणे बाग जोपासली. या कालावधीत बागेला लागणाऱ्या पाण्यावर पाऊण कोटी रुपये खर्च झाला असल्याचे फंड सांगतात.

१९८४ पासून  आयुष्यात सर्वाधिक वेळ फक्त शेती आणि द्राक्षबाग यांनाच दिला. त्यामुळे आज हे वैभव निर्माण झाले आहे. द्राक्षबागेमुळेच मुलांना चांगल्या इंग्रजी शाळेत शिकवू शकलो. आज एक मुलगा सॉफ्टवेअर अभियंता असून अमेरिकेत स्थायिक आहे. दोन मुले खांद्याला खांदा लावून वडिलांना द्राक्षबाग जोपासण्यासाठी, विकसित करण्यासाठी आणि निघालेले उत्पन्न जगाच्या बाजारपेठेत पोहचविण्यासाठी दिवसरात्र सहकार्य करतात.

मोटापर्यंत पोहोचण्यासाठी घोडय़ाचा उपयोग

बांगलादेश, दुबई, श्रीलंका, रशिया आणि युरोपमधील अनेक देशात त्यांच्या द्राक्षाची निर्यात होते. या वर्षी ४०० टनांहून अधिक द्राक्षाची निर्यात होईल, असा त्यांचा अंदाज आहे. भारतीय बाजारपेठेत ३५ ते ४० रुपये किलो असा द्राक्षाचा दर आहे. तर विदेशात ८० ते ९० रुपयांपर्यंत दर मिळतो. उन्हाळ्यात ११० विंधन विहिरी व १० विहिरीतून पाणी देण्यासाठी दुचाकीवरून जाणे शक्य नाही. घरी चारचाकी आणि दुचाकी वाहने आहेत. पण मोटारीपर्यंत जाण्यासाठी फंड यांनी एक घोडाही सांभाळला आहे. या वर्षी द्राक्षातून चार कोटी रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळेल, असा ते दावा करताहेत.