तीनशे जनावरांची अट आता दीडशेपर्यंत खाली

चारा छावण्यांसाठी असलेल्या किमान जनावरांची अट तीनशेहून दीडशेपर्यंत खाली आणण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे आता छोटय़ा छोटय़ा गावा-वस्तीवर किंवा दुर्गम भागातही अशी छावणी सुरू करता येणे शक्य होणार आहे.

यापूर्वी या किमान जनावरांच्या संख्या अटीमुळेच अनेक संस्था चारा छावण्या सुरू करण्यास उत्सुक नव्हत्या. मात्र, शासन पातळीवर घेण्यात आलेल्या निर्णयामुळे आता चारा छावणी सुरू करण्यास संस्थांचे प्रस्ताव दाखल होत आहेत. या एका बदलामुळे सांगलीतील गंभीर दुष्काळी असलेल्या आटपाडी व जत तालुक्यात नव्याने आठ ठिकाणी चारा छावण्या सुरू होणार आहेत. या निर्णयामुळे आता जनावरांची स्थानिक पातळीवरीलच छावणीत सोय होणार असून त्या जनावरांचा पुन्हा शेतक ऱ्यांना त्यांच्या शेतीकामासाठीही उपयोग करणे शक्य झाले आहे.

यापूर्वी चारा छावण्या सुरू करण्यास किमान ३०० तर कमाल ५०० जनावरांसाठी अट होती. यामुळे ही अशी छावणी तालुक्याच्या किंवा महत्वाच्या गावीच सुरू करणे शक्य व्हायचे. या अशा दूरच्या गावी जनावरे सोडून येणे, त्यांच्यासोबत घरातील एका व्यक्तीने राहणे, छावणीतील जनावरांचा अन्य उपयोग करण्यात येणाऱ्या अडचणी या साऱ्यांचा विचार करून गावोगावी छोटय़ा छोटय़ा आकाराच्या छावण्या सुरू करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. शासनाने कमाल आणि किमान संख्येबाबतची अट शिथिल केली असून, आता किमान १५० जनावरांसाठीही छावण्यांना मंजुरी मिळणार आहे, तर कमाल ३ हजार जनावरांपर्यंत एकाच छावणीत सोय करता येणार आहे. सांगली जिल्ह्य़ात आतापर्यंत ५० चारा छावण्यांना मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान जोपर्यंत पाऊस होत नाही, तोपर्यंत चारा-पाण्याची सोय करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्राधान्य दिले असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले.