करोनाचा गंभीर संसर्ग झालेल्या रुग्णांना स्थानिक पातळीवर प्राणवायूची सुविधा तातडीने देण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणाऱ्या ‘ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर’ या यंत्राची ऑनलाइन बाजारपेठेत टंचाई निर्माण झाली आहे.

वाहतूक आणि वापरण्याच्या दृष्टीने अत्यंत सोयीचे असलेल्या या यंत्राची देखभाल नगण्य असते. करोनाच्या पाश्र्वाभूमीवर या यंत्राला गेल्या वर्षापासूनच मागणी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह््यातील कुडाळ तालुक्यात सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून या यंत्राचा उत्तम प्रकारे वापर केला जात आहे. त्याबाबतचे वृत्त गेल्या १६ एप्रिल रोजी ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर या यंत्राची मागणी आणखीच वाढली आणि आता तर ऑनलाइन बाजारपेठेत त्याची टंचाई निर्माण झाली आहे.

चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या या यंत्राची किंमत सुमारे सहा महिन्यांपूर्वी ३७ हजार रुपये होती. वाढत्या मागणीमुळे या महिन्याच्या सुरुवातीला ती ४०-४५ हजार रुपयांवर, तर गेल्या आठवड्यात ५६ हजारांवर पोचली आणि आता तर ते उपलब्धच नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

सध्याच्या परिस्थितीत वैद्यकीय सुविधेचा अभाव असलेल्या ठिकाणी हे यंत्र गंभीर आजारी रुग्णांना मोठा आधार ठरू शकते, हे लक्षात घेता राज्य शासनाच्या पातळीवर ते उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने प्रयत्न होण्याची गरज आहे, असे मत कुडाळ तालुक्यात या यंत्राचा सामाजिक उपक्रम म्हणून वापर करत असलेले विनय सामंत यांनी व्यक्त केले.