दिवसभरात ३७७ रुग्णांची नोंद, तर पाच जणांचा मृत्यू

पालघर : तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. बुधवारी २४ तासांत तालुक्यात ३७७ करोनाबाधित रुग्ण आढळले, तर दिवसभरात पाच जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेने पालघर तालुक्यात दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान आहे.

पालघर जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ६,०४९ झाली आहे. यापैकी आतापर्यंत ४,३६९ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या १,५७२ करोना रुग्ण विविध उपचार केंद्रांमध्ये उपचार घेत आहेत. आतापर्यंत पालघर जिल्ह्यात १०८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

पालघर तालुक्यात करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन न केल्यामुळे एकमेकांच्या संसर्गातून ही रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे सांगितले जात आहे. पालघर तालुक्यामध्ये गेल्या २४ तासांत ३०९ रुग्णांची नोंद झाली. बुधवारी ९० रुग्णांची नोंद आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे बोईसर व परिसरातील आहेत. बोईसर व परिसरातील ग्रामपंचायतींमध्ये गेल्या चोवीस तासांत ११३ रुग्णांची नोंद झाली आहे. मंगळवारी बोईसरमध्ये ८१ तर बुधवारी ३२ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. करोनाबधितांचा आकडा वाढत असल्याने आरोग्य विभागात चिंता व्यक्त होत आहे आणि संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेणे आव्हान आहे, असे आरोग्य विभागाने सांगितले आहे.

बुधवारी डहाणू तालुक्यात तेरा, मोखाडा तालुक्यात तीन, पालघर तालुक्यात ९०, तलासरीमध्ये तीन, वसई ग्रामीण भागात एक, वाडा तालुक्यात बारा असे नव्या १२२ रुग्णांची नोंद झाली. विक्रमगड व जव्हारमध्ये बुधवारी एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. आत्तापर्यंत पालघर ग्रामीण भागात मृत्यूची संख्याही झपाटय़ाने वाढत आहे. ग्रामीण भागातील १०८ मृत्यूची नोंद आहे. यामध्ये डहाणू तालुक्यात १८ जणांचा मृत्यू झाला तर दोन जणांचा जव्हार तालुक्यात मृत्यू झाला. यामध्ये सर्वाधिक मृत्यू पालघर तालुक्यातील नोंदवले गेले असून ती संख्या ५७ आहे. तलासरी तालुक्यात एकाचा, तर वसई ग्रामीण भागात २२ जणांचा, विक्रमगड मध्ये तीन तर वाडा तालुक्यात पाच रुग्णांचा मृत्यू झाला.

पालघर जिल्ह्यात सध्या ४०७ प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आली आहेत. यामध्ये सर्वाधिक प्रतिबंधित क्षेत्र पालघर तालुक्यात नोंदवले गेले असून ही संख्या २०१९ आहे. या खालोखाल डहाणू तालुक्यात ४५ प्रतिबंधित क्षेत्र आहेत. वाडा तालुक्यात ४०, तलासरी तालुक्यात ३२, जव्हार तालुक्यात १४,  विक्रमगड तालुक्यात २४, वसई ग्रामीण भागात २४ तर मोखाडा तालुक्यात नऊ प्रतिबंधित क्षेत्र आहेत.