गाडी स्थानकातून सुटली.. थोडी पुढे गेली.. मात्र पुन्हा मागे फिरली.. प्रवाशांना समजेचना काय प्रकार आहे तो.. ‘स्टेशन वापसी’ झाल्यावर मंत्रिमहोदयांनी गाडीला हिरवा झेंडा दाखवला.. गाडी पुन्हा मार्गाला लागली.. हा सर्व प्रकार घडला, नागपूर रेल्वे स्थानकात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कार्यकर्मस्थळी उशिरा पोहोचल्याने संबंधित गाडीला ‘स्टेशन वापसी’ करावी लागली.
देशाच्या वेगवेगळ्या शहरांतून पाच नवीन गाडय़ांचा शुभारंभ बुधवारी ठरला होता. त्यात नागपूर-रिवा या साप्ताहिक गाडीचाही समावेश होता. सर्व यंत्रणा त्यासाठी सज्ज झाली होती. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू दिल्लीहून ‘रिमोट कंट्रोल’ने या गाडय़ांचा शुभारंभ करणार होते, तर नागपूर-रिवा साप्ताहिक गाडीला नागपुरातून नितीन गडकरी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करणार होते. नियोजित कार्यक्रमानुसार सुरेश प्रभू यांनी ‘रिमोट कंट्रोल’ची कळ दाबली, पण हिरवा झेंडा दाखवायला गडकरींचेच आगमन झालेले नव्हते. शेवटी राज्यसभा सदस्य अविनाश पांडे यांना हिरवा झेंडा हाती घ्यावा लागला. दरम्यान, गडकरी रेल्वे स्थानकावर आले, पण तोपर्यंत गाडीने वेग घेतलेला होता. प्रवाशांनी विनाकारण साखळी खेचल्यावर दंड करणाऱ्या रेल्वे खात्यानेच गडकरींसाठी साखळी खेचली आणि समोर गेलेली गाडी मागे परत आली. या गाडीला दुसऱ्यांदा गडकरींच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून ती पुन्हा पुढे सोडण्यात आली.
रेल्वे गाडीच्या शुभारंभाची वेळ दुपारी २.३० वाजताची आणि गाडी सुटण्याची वेळ २.४५ वाजताची होती. राज्याच्या उपराजधानीतून प्रथमच एका गाडीचा शुभारंभ ‘रिमोट कंट्रोल’ने करण्यात आल्याचा आनंद सर्वानाच झाला, पण त्याच वेळी सारे पुढे गेलेल्या गाडीला परत आणून आनंद सोहळ्यात विरजण पाडल्याची चर्चाही रेल्वे कर्मचारी आणि हा सोहळा अनुभवणाऱ्यांमध्ये होती.

देशातील ही पहिलीच घटना
एरवी विनाकारण गाडीची साखळी खेचली म्हणून प्रवाशांना दंडाला सामोरे जावे लागते. या ठिकाणी चक्क एका केंद्रीय मंत्र्यांसाठी गाडीची साखळी खेचण्यात आली. एकदा का हिरवा झेंडा दाखवला की, गाडी पुढे जाते परंतु पुढे गेलेल्या गाडीला मागे आणून दुसऱ्यांदा हिरवा झेंडा दाखवून पुढे पाठवण्याचा रेल्वेच्या इतिहासातला कदाचित हा पहिलाच प्रकार असावा. या घटनेचे साक्षीदार असणाऱ्यांसाठी ही घटना मात्र ऐतिहासिक ठरली.