राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पक्षाचे नेते व पदाधिकारी यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण केल्याचा आक्षेप घेत राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुरूवारी दुपारी आ. अपूर्व हिरे यांच्या सिडको येथील संपर्क कार्यालयाची तोडफोड केली. यावेळी हिरे यांच्या मोटारीची तोडफोड करण्यात आली. या घडामोडीनंतर आ. हिरे समर्थक आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अंबड पोलीस ठाण्यात गर्दी केली.
मालेगावचे हिरे कुटुंबिय आणि राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांच्यातील राजकीय वाद सर्वश्रुत आहे. यापूर्वी उभयतांमध्ये शाब्दीक वादंग झाले आहेत. परंतु, त्याचा उद्रेक या पध्दतीने झाला नव्हता. या वादाचे कारण फेसबुक साईटवरील आक्षेपार्ह लिखाण ठरले.
आ. हिरे यांनी फेसबुकवर राष्ट्रवादी काँग्रेस, पक्षाचे नेते आणि पदाधिकारी यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला. हा प्रकार निदर्शनास आल्यावर कार्यकर्त्यांनी हिरे यांच्या संपर्क कार्यालयावर हल्ला चढविला. पवननगर येथे हे कार्यालय आहे. कार्यकर्त्यांसमवेत काही महिला पदाधिकारी होत्या. यावेळी दगड, लाकडी ओंडके यांचा सर्रास वापर करण्यात आला. कार्यालयाबाहेर उभ्या असणाऱ्या आ. हिरे यांच्या पजेरो मोटारीवर दगडफेक करण्यात आली. अवघ्या काही मिनिटात कार्यालयाची नासधूस करुन कार्यकर्ते पसार झाले. अचानक झालेल्या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली. या घटनेची माहिती समजल्यानंतर उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर हिरे समर्थक मोठय़ा प्रमाणात परिसरात जमा झाले. त्यांनी अंबड पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकारी पोलीस ठाण्यात पोहोचले. यामुळे पोलीस ठाण्याबाहेर तणावाची स्थिती निर्माण झाली. जमावाला हटविण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 29, 2013 1:04 am