बीड : बिबटय़ामुळे गेल्या काही दिवसांपासून नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. सोलेवाडी (ता. आष्टी) येथे ज्वारीला पाणी देत असलेल्या शेतकऱ्यावर झडप मारून जखमी केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. बिबटय़ाने आतापर्यंत तिघांचा बळी घेतला असून चौघांवर हल्ले केले आहेत. त्याला जेरबंद करण्यात वनविभागाच्या पथकाला यश आलेले नाही.

बीड जिल्ह्य़ातील सोलेवाडी (ता. आष्टी) येथे आज (गुरुवारी) विकास विठोबा झगडे (वय ६०) हे शेतातील ज्वारीच्या पिकाला पाणी देत होते. तेव्हा बिबटय़ाने त्यांच्यावर हल्ला केला. मात्र आरडाओरड केल्याने बिबटय़ा पळून गेला. या घटनेत विकास झगडे यांच्या पायाला जखम झाली असून त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. बिबटय़ाने आतापर्यंत सुर्डी, किन्ही, पारगाव जोगेश्वरी (ता.आष्टी) येथे तिघांचे बळी घेतले आहेत. वनविभागाच्या सतरा पथकामधील सव्वाशे कर्मचारी आणि पुणे, नांदेड येथून आलेल्या नेमबाजांनाही त्याला पकडण्यात यश आलेले नाही.