राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवारी) नाशिक येथील सिव्हिल रूग्णालयास भेट देऊन, नाशिकमधील परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरं दिली. “करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अतिशय तर्कशुद्ध अशी व्यवस्था उभी केली आहे, तशीच राज्याने देखील करायला हवी. वारंवार केंद्राकडे बोट दाखवून चालणार नाही, आपल्या सर्वांना एकत्र काम करावं लागेल.” असं यावेळी फडणवीस म्हणाले .

माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, “माझ्यापरीने होईल ते मी राज्यासाठी करतच असतो, केंद्र सरकारने रेमडेसिविरचा सर्वाधिक साठा हा राज्याला दिला. ऑक्सिजनचा सर्वात मोठा साठा महाराष्ट्राला दिला. जवळ जवळ पहिल्याच खेपेत ११०० व्हेंटिलेटर हे महाराष्ट्राला दिले. आता पीएसए प्लॅन्ट देखील मोठ्याप्रमाणात महाराष्ट्राला दिले. त्यामुळे मला असं वाटतं की राज्य व केंद्रामध्ये कुठेही समन्वयाचा अभाव अशा प्रकारची अवस्था नाही. केंद्र सरकारने अतिशय तर्कशुद्ध व्यवस्था उभी केली आहे. तीच राज्याने देखील केली पाहिजे. वारंवार केंद्राकडे बोट दाखवून चालणार नाही. आपल्या सर्वांना एकत्रित काम करावं लागणार आहे. पंतप्रधान मोदींनी वारंवार सांगितलं आहे की आज एकत्रितपणे जनतेच्या पाठीशी आपण उभं राहायला हवं. म्हणून माझंही मत स्पष्ट आहे कोणी कुणाकडे बोट दाखवणं योग्य नाही, आपल्याकडे उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर आपण करायला हवा.”

तसेच, “देशात सर्वात जास्त ऑक्सिजन पुरवठा हा महाराष्ट्राला झाला आहे. परंतु त्यांचे योग्यप्रकारे वितरण हे राज्य सरकारने करायला हवं. मला असं वाटतं की बलशाली नेते तिथे ऑक्सिजन व रेमडेसिविर अशाप्रकारची अवस्था येऊ नये. सगळ्यांना समान प्रमाणात ते मिळायला हवं. त्यापेक्षाही जिथं मोठ्याप्रमाणावर रूग्ण आहे, तिथं ते मिळालं पाहिजे. नाशिकचा जर आपण विचार केला इथला पॉझिटिव्हिटी रेट हा ३० टक्क्यांवर चालला आहे. अशा परिस्थितीत इथं ऑक्सिजन किंवा रेमडेसिविरची आवश्यकता जास्त आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ही अवस्था लक्षात घेऊन ही व्यवस्था या ठिकाणी केली पाहिजे.” असंही यावेळी फडणवीस म्हणाले.

याचबरोबर, “मंत्र्यांनी आपल्या जिल्ह्याकडे लक्ष दिलंच पाहिजे परंतु, आपल्या जिल्ह्यात सगळ नेलं पाहिजे असा जर विचार मंत्र्यांनी केला. तर त्यांनी हे देखील लक्षात घेतलं पाहिजे की ते राज्याचे मंत्री आहेत. त्यामुळे असं जर कुठं होत असेल तर ते योग्य नाही. मला असं वाटतं की जे पॉवरफुल मंत्री समजले जातात, त्या सर्व मंत्रांना माझी विनंती आहे की तुमच्या जिल्ह्याच्या व्यतिरिक्तही जे काही जिल्हे आहेत, विशेषता ज्या जिल्ह्यांमध्ये जास्त प्रादुर्भाव आहे. अशा जिल्ह्यांकडे त्यांनी अधिक लक्ष द्यायला हवं.” असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

“आमचा प्रयत्न एवढाच आहे की, प्रशासन आपल्यापरीनं काम करतं आहे, त्याला आणखी काय मदत करता येईल.. त्याप्रकारे मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. रेमेसिविरचा पुरवठा सातत्याने व्हावा यासाठी आमचा दबाब राहीलच, ऑक्सिजनची परिस्थिती पाहूनच मी सर्वांशी बोललो आहे. राज्याच्या कोट्याच्या व्यतिरिक्त काही वाढीव कोटा मी नाशिकसाठी मिळवून घेतला आहे. असं देखील यावेळी फडणवीस यांनी सांगितलं.” अशी माहिती देखील यावेळी फडणवीस यांनी दिली.