दारूबंदीवर हॉटेल व्यवसायी व मद्य शौकिनांनी ‘फ्रूट बीयर’चा पर्याय शोधून काढला असून हैदराबाद येथून येणारी ही बीयर अर्थात फळांचा रस शहरातील विविध हॉटेलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. मद्य शौकिनांमध्ये एका कंपनीची ‘फ्रूट बीयर’अल्पावधीत लोकप्रिय झाली आहे.
जिल्ह्यात १ एप्रिल २०१५ पासून संपूर्ण दारूबंदी लागू झाली आहे. याचा सर्वाधिक परिणाम बीयर बार व रेस्टारंटवर झालेला आहे. जिल्हय़ातील ३२५ व चंद्रपूर शहरातील ९६ बीयर बार व रेस्टॉरंटपैकी बहुतांश हॉटेल बंद पडले आहेत. तर काही नामांकित व प्रसिद्ध हॉटेल ‘फॅमिली रेस्टारंट’मध्ये परावर्तीत झाले आहेत. छोटे मोठे धाबे व मुख्य मार्गावरील काही हॉटेल सुरू आहेत. आता या हॉटेलचा व्यवसाय स्थिर राहावा व मद्य शौकिनांची हौस पूर्ण व्हावी म्हणून हॉटेल व्यवसायिकांनी यावर फ्रूट बीयरचा पर्याय शोधून काढलेला आहे. शहरातील बहुतांश सर्वच मोठय़ा हॉटेलमध्ये आजच्या घडीला ही फ्रूट बीयर उपलब्ध आहे.
अल्कोहोलचे अतिशय अल्प प्रमाण यामध्ये असते. तसेच या बीयरच्या विक्रीसाठी कुठलाही परवाना लागत नाही. त्यामुळे मद्य शौकिनांना हॉटेलमध्ये दारू ऐवजी ही फ्रूट बीयर उपलब्ध करून दिली जात आहे.
फ्रूट बीयर म्हणजे फळांचा रस आहे. त्यात अतिशय अल्प प्रमाणात अल्कोहोल आहे. शहरातील बहुतांश हॉटेल व्यवसायिकांनी बीयरच्या बॉटल प्रमाणे फ्रूट बीयरची बॉटल हॉटेलच्या बारमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे सजवून ठेवलेली असल्याचे चित्र येथे बघायला मिळत आहे. केवळ हॉटेलच नाही तर शहरातील पानठेले व कोल्ड्रींग सेंटरमध्ये सुद्धा आजच्या घडीला ही फ्रूट बीयर उपलब्ध आहे.
आजच्या घडीला शहरात मुबलक दारू उपलब्ध असली तरी पिण्यासाठी व गप्पांचा फड रंगवण्यासाठी हॉटेल नाही. जागा असली तरी पोलिसांच्या कारवाईची कायम भीती आहे. त्यामुळे आता शहरातील हॉटेलमध्ये फ्रूट बीयरसोबत गप्पांच्या मैफली पुन्हा रंगायला सुरुवात झालेली आहे.