चंद्रपूर जिल्ह्यातील दारूविक्रेत्यांनी दारूबंदी लागू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याचे ठरविले आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी हा निर्णय घेतल्याचा आरोप करीत येत्या १ एप्रिलपासून लागू करण्यात येणाऱ्या दारूबंदीच्या निर्णयाला दारूविक्रेत्यांनी जोरदार विरोध दर्शविला आहे. याविरोधात येत्या ३० जानेवारी रोजी गांधी पुण्यतिथीच्या दिवशी ते मोर्चा काढणार असल्याचीही माहिती दारूविक्रेत्यांच्या संघटनेतर्फे देण्यात आली. या निर्णयामुळे दारूच्या व्यसनाला आळा बसण्याऐवजी उलट अवैध दारूविक्रीचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले. या व्यवसायावर जिल्ह्यातील तब्बल १० हजार लोकांचा रोजगार अवलंबून असल्यामुळे या निर्णयाचा फेरविचार व्हावा, अशी दारूविक्रेत्यांची मागणी आहे.
चंद्रपूर जिल्ह्य़ात दारुबंदी लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला असून ती १ एप्रिलपासून लागू होणार आहे. वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्य़ानंतर आता चंद्रपूर हा दारुबंदी झालेला राज्यातील तिसरा जिल्हा आहे