ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आणीबाणीचे चटके सोसले असल्याने त्यांचे यासंदर्भातील वक्तव्य गांभीर्याने घ्यायला हवे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केले. साखर उद्योगासाठी जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजचा उस उत्पादकांना काहीही लाभ होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली त्या वेळी अडवाणी यांनी तुरुंगवास भोगला आहे. त्या वेळची  परिस्थिती अवगत असल्यामुळे त्यांच्या आणीबाणीसंदर्भातील वक्तव्याला आधार आहे. यामुळेच त्यांचे वक्तव्य देशाने गांभीर्याने घ्यायला हवे, असे पवार म्हणाले. शासनाने अडचणीतील साखर उद्योगासाठी ६ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. मात्र या पॅकेजचा उस उत्पादकांना लाभ मिळणार नाही. यातून साखर कारखान्यांना बिनव्याजी मदत देण्यात येणार असली तरी ही मदत आणखी आठ महिन्यांनी मिळणार आहे. मदत मिळेल तेव्हा ४ महिन्याचे व्याज द्यावे लागणार आहे.
अडचणीतील साखर कारखान्यांना आमच्या सरकारने पॅकेज दिले होते. त्या वेळी व्याजाचा भार कारखान्यांवर पडू दिला नाही. शासनाने त्यांचे व्याज भरले होते, असेही ते
म्हणाले.  बिहारमध्ये लवकरच विधानपरिषदेच्या २४ जागांसाठी निवडणूक होत असून त्याठिकाणी लालूप्रसाद, नितीशकुमार, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात आघाडी करण्यात आली आहे.
विधानसभेलाही ही युती कायम राहणार आहे.

‘भुजबळांबाबत सत्य समोर येईल’
छगन भुजबळांबाबत पवार म्हणाले की, एखाद्या व्यक्तीची चौकशी सुरू असताना यासंदर्भात माहिती जाहीर करण्याची पहिलीच वेळ असावी. मीही अनेक पदे भूषवली आहेत, मात्र अशी स्थिती केव्हाच निर्माण झाली नव्हती. ही बाब दुर्दैवी असून तपास यंत्रणांनाच माहिती प्रसिध्दीमाध्यमांना सांगण्याची घाई झाली आहे. याबाबत चौकशीनंतर अंतिम सत्य समोर येईल तोपर्यंत मी बोलणे उचित होणार नाही. ‘आयपीएल’चे माजी अध्यक्ष ललित मोदी यांना इंग्लंडमध्ये भेटलो, यामध्ये कोणता गुन्हा केला असे आपल्याला वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले. एका भारतीयाला परदेशात भेटणे अयोग्य आहे असे वाटत नसल्याचेही त्यांनी सांगितले.