प्रशांत देशमुख

दैनंदिन जीवनोपयोगी वस्तू घेण्यासाठी किराणा दुकानही नसणाऱ्या दुर्गम भागातील गावांची अडचण लक्षात येताच मुंबईसह अन्य ठिकाणांहून मदतीचे हात भरभरून पोहोचल्याने निरागस आदिवासी बांधव सुखावून गेले आहेत.

पर्यावरण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या धरामित्र संस्थेतर्फे आदिवसीबहूल दुर्गम गावात शाश्वत शेती प्रसाराचे कार्य चालते. रोहणा परिसरातील अशा ११ गावातील भूमिहीन, मजूर व शेतकरी कुटूंबाची स्थिती संचारबंदीच्या काळात बिकट झाल्याचे निदर्शनास आल्यावर संस्थेचे डॉ. तारक काटे यांनी या कुटूंबाची विचारपूस केली.

सालधरा, पांजरा, खैरी व अन्य काही गावात किराणा दुकानेही नसल्याची आढळले. दैनंदिन वस्तू मिळत नसल्याने व प्रशासनापर्यत स्थिती पोहचत नसल्याने धरामित्रने स्थानिक पुढाऱ्यांच्या मदतीने गरजू कुटूंबाची सूची तयार केली. या कुटुंबासाठी मदतीचे आवाहन करण्यात आल्यावर मुंबईच्या दिलनवाज वरियावा, बालाजी मंदिर ट्रस्ट, संजय मोहता आदींनी मदतीचा हात पुढे केला.

आणखी वाचा- राज्यातील अंगणवाडी बालकांना मिळणार घरपोच शिधा

सहा गावातील २६६ गरजूंना दोन आठवडे पुरेल एवढा किराणा व धान्याचे वाटप करण्यात आले. युवा उद्योजक राहुल ठाकरे यांनी साठ कुटुंबांना धान्यसाठा दिला. दुर्लक्षित ग्रामीण गरजूंबाबत अशीच आस्था दिसून आल्यावर गावकऱ्यांनी कृतज्ञताही व्यक्त केली.