अवघं जग सध्या करोना विषाणूच्या सावटाखाली आहे. दरम्यान, आज जागतिक पुस्तक दिन आहे. या दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जनतेला एक महत्वाचा संदेश दिला आहे. सध्या लॉकडाउनमुळं सर्वजण घरातच आहेत. या काळात नैराश्य आलं असेल तर पुस्तकं आपले चांगले सोबती होऊ शकतात असं त्यांनी ट्विटद्वारे सुचवलं आहे.

शरद पवार म्हणतात, “पुस्तकं आपल्या आयुष्यातील सोबती आहेत. लॉकडाऊनच्या काळात हताश न होता विविध विषयांची चांगली पुस्तकं वाचावीत. पुस्तकांमधील समृ़द्ध विचारांनी आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम होईल. सर्वांना जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”

लॉकडाउनमुळं लोकांना घरातच राहण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे ते आता विविध प्रकारे आपला वेळ घालवण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामध्ये घरात अडगळीत पडलेले जुने बैठे खेळ, मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून विविध माहितीपूर्ण गोष्टी ऐकणे, पाहणे. तसेच आपले आवडीचे छंद जोपासतानाही अनेकजण दिसत आहेत. त्याचबरोबर ऑनलाइन पुस्तकं वाचण्यातही अनेकजण रमले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगल्या दर्जेदार पुस्तकांच्या लिंक ते एकमेकांना शेअर करीत आहेत.

एरव्ही कामांमध्ये व्यस्त असल्याने पुस्तक वाचणं दिवसेंदिवस कमी होत असताना आजच्या पुस्तक दिनाचे औचित्य साधत तसेच लॉकडाउनमुळे काही लोकांमध्ये आलेलं नैराश्य पाहता, यावर मात करण्यासाठी चांगल्या विचारांची पुस्तक आपल्याला साथ देऊ शकतात. हेच शरद पवार यांनी लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे.