राष्ट्रीय महामार्गाने जोडल्या गेलेल्या कोल्हापूरमध्ये दळणवळण मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये लॉजिस्टिक पार्क सुरू करण्यात येईल, अशी घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी केली. विविध क्षेत्रातील उद्योजकांशी संवाद साधत असताना ते बोलत होते.

टाळेबंदी नंतर कोल्हापूर सांगली जिल्ह्यात उद्योगाचे नानाविध प्रश्न निर्माण झाले आहेत. याबाबत खासदार धैर्यशील माने यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये आमदार चंद्रकांत जाधव, विविध औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी, निवडक पत्रकार सहभागी झाले होते. यावेळी उद्योजकांनी विविध प्रकारच्या मागण्या केल्या. त्याचा संदर्भ घेऊन उद्योग मंत्री देसाई बोलत होते.

कोल्हापुरात लॉजिस्टिक पार्क सुरू करण्याच्या मागणीला त्यांनी तात्काळ होकार दर्शवला. तसेच, राज्य औद्योगिक विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कोल्हापुरात लॉजिस्टिक पार्क सुरु होण्यासाठी जागेचा शोध घ्यावा. यासाठी लोकप्रतिनिधी, उद्योजक यांनी सहकार्य करावे. याकामी शेतजमीन घेता येणार नाही. शेतजमीन वगळता इतर जमीन मिळवण्या मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत. जागामालकांना योग्य ती किंमत देऊन कोल्हापुरात लॉजिस्टिक पार्क सुरू केले जाईल. त्यामुळे कोल्हापूरच्या विकासाला गती येईल, असा विश्‍वास देसाई यांनी व्यक्त केला.

वस्त्रोद्योगाचे प्रश्न सोडवणार
राज्यात इचलकरंजी सह अनेक ठिकाणी वस्त्रोद्योग सुरू आहे. त्यातील अडचणी सोडवण्याबाबत उपमुख्यमंत्री, वित्त मंत्री यांच्यासोबत एक बैठक झाली आहे. वीजदर सवलत, प्रदूषणा सारख्या प्रश्नांची मांडणी झाल्यावर हे प्रश्न सोडवण्याचे भूमिका शासनाने घेतली आहे. दरम्यान करोना विषाणू मारामारीचा प्रश्न उद्भवल्याने काम थांबले असले तरी पुन्हा त्याला चालना देण्यात येईल, असेही देसाई यांनी सांगितले.

पायाभूत सुविधांना गती
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विमानसेवेचे जाळे विस्ताराबरोबरच पायाभूत सुविधांना गती दिली जाईल. करोनाचे संकट आले असताना दुसरीकडे देशात परकीय गुंतवणूकदार पुन्हा एकदा येत आहेत. त्यांना महाराष्ट्रकडे येण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्यातील एखादा उद्योग कोल्हापूरमध्ये आणण्यासाठी प्रयत्न राहतील, असेही देसाई यांनी स्पष्ट केले.