विखे, मोहिते-पाटील यांच्यानंतर आता वसंतदादांचे घराणे

भाजपची हवा निर्माण झाल्याने राज्याच्या राजकारणातील व सहकारातील मातब्बर समजली जाणारी काँग्रेस व राष्ट्रवादीतील बडी घराणी भाजपच्या आश्रयाला गेली आहेत.

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू प्रतिक पाटील यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपच्या वाटेवर असल्याचे सूचित केले. अलीकडेच त्यांनी भाजप नेत्यांची भेट घेतली होती. प्रतिक पाटील हे सांगलीचे माजी खासदार असून, केंद्रात राज्यमंत्रीपदही त्यांनी भूषविले आहे. सांगलीत उमेदवारीसाठी त्यांच्या नावाचा विचार न झाल्याने ते नाराज होते.

सांगलीची जागा काँग्रेसने राजू शेट्टी यांच्या स्वाभिमान शेतकरी संघटनेला सोडण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्य़ातील काँग्रेस नेत्यांमध्ये संतप्त भावना पसरली आहे. राज्याच्या स्थापनेपासून २०१४चा अपवाद वगळता सातत्याने या मतदारसंघात काँग्रेसने विजय संपादन केला होता. हा मतदारसंघ राजू शेट्टी यांच्या संघटनेसाठी सोडल्याने काँग्रेसमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. ही संधी साधून प्रतिक पाटील यांनी भाजपमध्ये जाण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली आहेत.

अहमदनगरची जागा राष्ट्रवादीने न सोडल्याने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पूत्र सुजय यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. यापाठोपाठ सोलापूर जिल्ह्य़ाच्या राजकारणातील मातब्बर अशा मोहिते-पाटील घराण्यातील रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

विखे-पाटील, मोहिते-पाटील, वसंतदादा घराण्यातील तिसऱ्या पिढीतील नेत्यांना भाजपचा आधार वाटू लागला आहे. भाजपची हवा निर्माण झाल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांना भाजपचे आकर्षण वाढले आहे. भाजप पुन्हा केंद्रात सत्तेत आल्यास राज्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीतील आणखी काही बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. पक्ष वाढीसाठी भाजपने आपली द्वारे काँग्रेस व राष्ट्रवादीतील बडय़ा नेत्यांसाठी उघडली आहेत.

अनंत गाडगीळ यांचीही काँग्रेसवर नाराजी

वसंतदादा पाटील यांचे नातू आणि माजी मंत्री प्रतीक पाटील यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला असतानाच पुण्यातील काँग्रेस पक्षाशी निष्ठावंत असलेल्या गाडगीळ घराण्यातील आमदार अनंत गाडगीळ यांनीही काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर कडवट टीका करताना नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस पक्षाकडून माझ्यावर सातत्याने अन्याय करण्यात आला. काँग्रेस आणि गाडगीळ घराण्याचे वैचारिक संस्कार माझ्यावर आहेत. माझ्या जागी दुसरा कोणी असता, तर त्याने या परिस्थितीत काँग्रेस पक्ष कधीच सोडला असता, असे अनंत गाडगीळ ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.