समीर मेटांगळे खून प्रकरणाने पोलिसांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर

धनदांडग्यांचा पोलिसांवर दिसून येणारा प्रभाव, आरोपी असलेली विशीतील मुले, आरोपीच्या दुकानावर दगडफेक  करून व्यक्त केलेला रोष, तपास अधिकारी बदलूनही तपासात विसंवाद, परिणामी आमदारांच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव, बधिर समाजमन, पालकांचा कोडगेपणा अशा घटनांनी समीर मेटांगळे खून प्रकरण रोज गाजत आहे. मात्र, यात पोलिसांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगल्या जाऊनही तपासात दिसून येणारी मंदगती एकूणच प्रकरणावर प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहे.

एका अल्पवयीन मुलासह दहा किशोरवयीन मुलांच्या सहभागाचे हे प्रकरण प्रथमपासूनच पोलिसांच्या नाकर्तेपणाने गाजत आहे. अशा प्रकरणात अपेक्षित पोलीस प्रशासनाची संवेदनशीलता कुठे हरविली, याचेही उत्तर नाही. १५ डिसेंबरला समीर मेटांगळेचा त्याच्याच कथित मित्रांनी सुऱ्याने भोसकून खून केला. खून करणारे तिघेही हसतहसत दुचाकीवर पळत गेल्याची चित्रफीत सर्वत्र फिरली. मात्र, तरीही आरोपी कोण, असा पोलिसांना पडलेला प्रश्न संतप्त युवकांनी आरोपीच्या दुकानावर दगडफेक करीत सोडविला. न्याय मिळत नसल्याची सार्वत्रिक चर्चा झडू लागल्यावर प्रकरण जिल्हय़ात कोरी पाटी असणाऱ्या नव्या पोलीस उपअधीक्षकांकडे सोपविण्यात आली.

प्रकरणात पैसाच बोलतो आहे, असे सार्वत्रिक मत झाल्यावर मारेकऱ्यांचे कुटुंबही दबावात आले. कारण आपला तो कार्टा व दुसऱ्याचा तो बाब्या, हे एव्हाना उघड झाले होते. व्यसनमुक्ती केंद्रातून परतल्यावर युद्ध जिंकल्याच्या थाटात मुलाला दोन लाखांची बाईक भेट देणाऱ्या पालकांचा हा कोडगेपणा की हतबलता हे त्यांनाच उमजावे. दिवटय़ांच्या प्रेमापोटी पिझ्झावर ४० हजार रुपये महिन्याकाठी उधारी चुकवणाऱ्या पालकांना आपले चिरंजीव गांजा या भुरटय़ा नशेच्या आहारी गेल्यावर आवरणे शक्य होते. पण, तसे न करणाऱ्या पालकांना थेट खुनाची हिम्मत दाखविणाऱ्या मुलांसाठी आता पदोपदी धन वेचणे अपरिहार्य ठरावे.

दहाही मुले विशीतील म्हणजेच मिसरूड फुटू लागलेली. याच कोवळ्या वयात निगराणीची गरज सर्वमान्य आहे. तशी ती या प्रकरणात बचावार्थ धावपळ करणाऱ्या पालकांनी ठेवली नसल्याचे स्पष्ट होते. बाईक रेस, त्यात झालेला पराभव, त्यापोटी फेसबुकवर शिवीगाळ, इन्स्टाग्रामवर थेट आव्हान व मग त्याचा अंमल करणारी मुले कोवळ्या वयातच किती पाषाणहृदयी झाली, याचेच प्रत्यंतर या प्रकरणी आले. मुलांच्या पायावर सुखाच्या राशी आंधळेपणाने ओतणारे पालक गुन्हय़ाचे रोपटे उगविल्यावर पश्चात्तापदग्ध धावपळ करतात. त्यातूनच त्यांच्यावर समाजाचा रोषही व्यक्त होतो. आरोपीच्या दुकानावर जाहीर दगडफेक करणाऱ्यांची तक्रार करण्याचेही याच पश्चात्तापातून टाळले जाते.

आता तपासाची सूत्रे सांभाळणारे पोलीस उपअधीक्षक दिलीप सावंत व त्यांना साहाय्य करणारे पोलीस निरीक्षक पराग पोटे यांना अद्याप संशयास्पद ठरलेले कोडे सोडवायचे आहे. पण, त्यासाठी या दोघांत व पोलीस अधीक्षक एस. निर्मलादेवी यांच्यात दिसून येणारा विसंवाद प्रथम थांबणे अपेक्षित आहे. आरोपीला अटक झाली काय, या प्रश्नावर वेगवेगळी उत्तरे फेकली जातात. उशिरा निघणारी प्रेसनोट परत संभ्रम निर्माण करते. या अशाच गोंधळाच्या पाश्र्वभूमीवर आमदार डॉ. पंकज भोयर यांनी काही आमदारांसह मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा अहवाल मागविल्याचे उत्तर आमदारांनी दिले. काही मुले गांजा सेवन करणारी म्हणून गांजाविक्री करणाऱ्यांची धरपकड करण्याचा बालीशपणा थांबावा. मुख्य आरोपीने स्वत:च्या बचावार्थ मृत मुलाच्या मित्रांवर तक्रार केल्यावर गुन्हे दाखल करण्याची तत्परता कशापोटी दाखविली जाते, हे लपून राहिलेले नाही. या प्रकरणाच्या निमित्ताने दिल्लीच्या देशभर गाजणाऱ्या प्रद्युम्न ठाकूर हत्याकांडाचा संदर्भ दिला जात आहे.

या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला सज्ञान समजून त्याच्यावर खटला चालवला जाईल, असा निर्णय बालन्यायालयाने दिला आहे. या प्रकरणातसुद्धा एक अल्पवयीन आरोपी आहे. त्याच्यावर काय कारवाई होते, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. प्रकरण दिल्लीचे असो की वध्र्यातील, अल्पवयीन गुन्हेगारीचा मुद्दा सामाजिक चिंतेचा विषय ठरत आहे. वध्र्यातील मेटांगळे खून प्रकरणात समाजाची सहानुभूती व राग कुणाविषयी आहे हे ओळखून तपासाची पावले पडली तरच ‘किती वाटले’ याची चर्चा व पुढील मोर्चा टळेल.

‘तपासात विसंवाद नाही’

रामनगर पोलिसांकडून तपास काढून घेतल्यानंतर तो उपअधीक्षक सावंत यांच्याकडे सोपवताना स्थानिक अधिकारी म्हणून पराग पोटे यांना दिमतीस देण्यात आले असून विसंवाद नाही. प्राथमिक तक्रारीनंतर मृत समीरच्या मित्रावरही गुन्हे दाखल झाले. पण, त्यात तथ्य असेल तरच आरोपपत्रात ते नमूद होतील. लहानसहान घडामोडींची मी माहिती ठेवत असून यापुढे शंकेला वाव राहणार नाही. अल्पवयीन आरोपीच्या सहभागाबद्दल कायदेशीर बाबी तपासून कारवाई होईल. संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या रामनगर पोलिसांवर स्वतंत्र चमूमार्फत चौकशी करू. बोट ठेवायला जागा मिळू नये याविषयी मी दक्ष आहे, अशी हमी अधीक्षकांनी दिली.  – एस. निर्मलादेवी, पोलीस अधीक्षक, वर्धा</strong>