माधवनगर येथील लॉर्ड बालाजी बँकेत झालेल्या सुमारे सहा कोटींच्या अपहारप्रकरणी अध्यक्ष नंदकुमार रामचंद्र जाधव याला सांगली पोलिसांनी अटक केली. गेली २ वष्रे पोलिसांना चकवा देणारा जाधव पुण्यातील सिंहगड रोड येथे एका बंगल्यात वास्तव्यास होता. शासकीय लेखा परीक्षकांनी लॉर्ड बालाजी बँकेच्या संचालक मंडळाविरुद्ध २ वर्षांपूर्वी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
नंदकुमार जाधव, उपाध्यक्ष संगाप्पा कौजलगी यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी माधवनगर येथे लॉर्ड बालाजी बँकेची स्थापना केली होती. मोठय़ा व्याजाचे आमिष दाखवून कोटय़वधी रुपयांच्या ठेवी गोळा केल्या. सभासदांसह उद्योजकांना कर्जपुरवठा न करता संचालक मंडळाने स्वहित साधण्यासाठी नियमबाह्य कर्ज उचलले. अध्यक्ष जाधव याने व्यक्तिगत कर्जाबरोबरच पत्नीच्या नावे वेगवेगळय़ा संस्थांना सुमारे ४ कोटी ५५ लाख कर्ज दर्शवून रकमा उचलल्या. यापकी काही फर्मच अस्तित्वात नाहीत असे लेखापरीक्षणात आढळून आले आहे.
लॉर्ड बालाजी बँकेत १९९८ ते २०१३ दरम्यान संचालक व व्यवस्थापनाने संगनमत करून ५ कोटी ९० लाख ६४ हजारांचा घोटाळा केल्याचे निदर्शनास येताच लेखापरीक्षकांनी संचालक मंडळाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून अध्यक्ष जाधव फरारी होता. तो पुणे येथे सिंहगड रोडवर राहात असल्याचे समजताच आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक इंद्रजित काटकर यांनी त्याला अटक केली.