लागवडीचे क्षेत्र ३० हेक्टरने घटले

कोकणात घटलेल्या पर्जन्यमानाचा फटका खरीप हंगामावर फारसा झाला नसला, तरी रब्बी हंगामावर याचा परिणाम दिसण्यास सुरुवात झाली आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पीक लागवडीपासून दूर राहणे पसंत केल्याचे दिसून येत आहे. अलिबाग तालुक्यातील पांढऱ्या कांद्याच्या लागवड क्षेत्रात तब्बल ३० हेक्टर घट झाल्याचे कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात समोर आले आहे.

रायगड जिल्ह्यात दरवर्षी सरासरी साडेतीन हजार मिलीमीटर पावसाची नोंद होत असते. मात्र यावेळेस यात सरासरी हजार मिलीमीटर पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे. या परिस्थितीचा खरिपातील भात लागवडीवर फारसा परिणाम झाला नसला, तरी रब्बी हंगामातील वाल, पावटा, चवळी, पांढरा कांदा यावर परिणाम झाल्याचे आता दिसून येत आहे.

अलिबाग तालुक्यात दरवर्षी २५५ हेक्टरवर पांढऱ्या कांद्याची लागवड केली जाते, मात्र यावर्षी २२५ हेक्टर क्षेत्रामध्ये पांढऱ्या कांद्याची लागवड करण्यात आली आहे. परंतु,म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ३० हेक्टर क्षेत्रामध्ये कांदा लागवडीची घट झाली आहे.

अलिबाग तालुक्यात काल्रे, खंडाळा, बहिरोळे, वावे, चौल, ढवर, बामणगाव परिसरात या कांद्याची लागवड केली जाते. रुचकर चव आणि औषधी गुणधर्म असल्याने तालुक्यातील पांढऱ्या कांद्याला मोठय़ा प्रमाणात मागणी आहे. मुंबई, ठाणे आणि पुणे जिल्ह्यांतील बाजारात चढय़ा दराने याची विक्री केली जाते.

भातकापणी झाल्यानंतर तत्काळ कांद्याची लागवड केली जाते. ऑक्टोबर ते जानेवारी हा लागवडीचा कालावधी असतो. साधारणपणे फेब्रुवारीच्या सुरुवातीला कांदा बाजारात दाखल होण्यास सुरुवात होते. मे अखेपर्यंत हा कांदा बाजारात विकला जातो. दर्जेदार कांद्याला किलोमागे ७५ रुपयांपर्यंतचा दरही मिळतो. त्यामुळे अलिबाग परिसरातील शेतकरी भात शेतीनंतरचे दुबार पीक म्हणून कांद्याची मोठय़ा प्रमाणात लागवड करत असतात.

कांद्याची लागवड पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. जितका पाऊस जास्त तितकी कांद्याची लागवड अधिक केली जाते. मात्र पर्जन्यमान घटल्याने जमिनीत पिकासाठी उपयुक्त ठरेल अशी आद्र्रता दिसून येत नाही, त्यामुळे शेतकरी कांदा लागवडीपासून दूर राहिल्याचे चित्रसध्या पाहायला मिळते आहे.

गादी वाफ्यावर कांदा तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत प्रशिक्षण देण्यात आले आहे. कांदा लागवडीचे क्षेत्र घटले असले, तरी उत्पन्नात घट होणार नाही. अलिबाग तालुका कृषी अधिकारी के व्ही जानुगडे यांनी सांगितले.