गहू, हरभरा, कांदा पिकांना पोषक वातावरण; घसरत्या पाऱ्याने द्राक्षाच्या  वाढीवर विपरित परिणाम; आंब्याचा मोहोर चांगला; फळधारणेला अनुकूल

राज्यात गेल्या काही दिवसांत थंडीचे वास्तव्य कायम असल्याने या हंगामातील गहू, हरभरा, कांदा अशा नगदी पिकांनी जोर धरला असतानाच द्राक्ष पिकावर मात्र घसरत्या पाऱ्याचा विपरीत परिणाम होत आहे. नाशिक, सांगली जिल्ह्य़ांतील द्राक्षबागा संकटात सापडल्या असून थंडीचा बहर असाच कायम राहिला तर द्राक्षांचे घड बागांमध्येच कोमजले जातील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. विदर्भातील तूर पिकालादेखील वाढत्या थंडीचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. ज्वारीवरही चिकटा पडण्याचा धोका वर्तवला जात आहे.

थंडीने राज्याच्या सर्वदूर भागांत जोर धरला आहे. या दिवसांत एरवी असणारे ढगाळ हवामान यंदा अभावानेच असल्याने गहू, हरभरा, कांदा यांच्या वाढीला हे वातावरण पोषक ठरत आहे. धुक्याचेही प्रमाण जास्त नसल्याने पिके कोमेजण्याची शक्यता नाही. थंडीच्या काळात पिकांना द्यावी लागणारी कीटकनाशके सध्याच्या अनुकूल वातावरणात वापरावी लागत नसल्याने यंदा पिकांचा कस अधिक चांगला राहील असे सांगण्यात येते. आंब्याचा मोहोर चांगला धरला असल्याने आगामी हंगामात फळधारणा मोठय़ा प्रमाणावर हेईल असे अनुमान आहे. थंडीच्या कडाक्याने गहू, हरभरा पिकाला मात्र पोषक स्थिती निर्माण झाली आहे. रब्बी हंगामातील गहू, हरभरा, करडई या पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. थंडीमुळे गव्हाचे फुटवे जास्त होत असून गहू पोसण्यास चांगली मदत होत आहे. याचबरोबर हरभऱ्यावरील आंब दव वाढण्यास थंडीने मदत होत असून यामुळे पोकळ घाटे राहण्याऐवजी फळधारणा होण्यास साहाय्यभूत ठरत आहे.

भाजीपाल्यावर बदलत्या वातावरणाचा फारसा परिणाम होणार नसला तरी वाढत्या थंडीने टोमॅटो, वांगी व मिरचीच्या पिकावर परिणाम होण्याची शक्यता आहे. आणखी काही दिवस मुक्काम ठोकला तर सर्वत्र ज्वारीवर चिकटा नावाचा रोग पडेल.

द्राक्षपट्टय़ात चिंतेचे वातावरण

कडाक्याच्या थंडीमुळे नाशिक जिह्य़ात द्राक्ष बागांची कार्यक्षमता मंदावली असून त्याचा परिणाम द्राक्ष मण्यांच्या विकासावर होत असल्याची धास्ती उत्पादक व्यक्त करीत आहे. निर्यातक्षम द्राक्षांसाठी मण्यांना विशिष्ट आकार प्राप्त होणे गरजेचे ठरते. या वर्षी अडीच महिने थंडीने मुक्काम ठोकल्याने या प्रक्रियेत अडथळे येत आहे. त्याचा परिणाम द्राक्षांच्या निर्यातीवर होणार असल्याची साशंकता व्यक्त होत आहे. थंडीपासून बागांना वाचविण्यासाठी काही ठिकाणी शेकोटी पेटविण्याची कसरत करावी लागत आहे.

थंडीचा कडाका वाढल्याने द्राक्ष वेलींची अन्न द्रव्य तयार करण्याची प्रक्रिया मंदावते. आवश्यक त्या प्रमाणात अन्न द्रव्यनिर्मिती होत नाही. याचा द्राक्ष मण्यांच्या विकासावर परिणाम होतो. १५ ऑक्टोबरनंतर छाटणी झालेल्या द्राक्ष बागांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. निर्यातक्षम द्राक्षांना या वातावरणाचा सर्वाधिक फटका बसणार आहे. कारण, निर्यातीसाठी विशिष्ट आकारातील मणी तयार व्हावे लागतात. थंडीमुळे त्यात अवरोध आला आहे. आवश्यक तो आकार न झाल्यास त्यांची निर्यात होऊ शकणार नाही. या काळात सूक्ष्म अन्न द्रव्यासाठी औषधांची फवारणी करावी लागेल. यामुळे खर्चात काहीशी वाढ होईल, असे द्राक्ष उत्पादक संघाचे विभागीय अध्यक्ष माणिकराव पाटील यांनी सांगितले.  सांगली जिल्ह्य़ात द्राक्षावर बुरशीजन्य रोगांचा मारा एकीकडे होत असताना दुपारच्या उन्हाच्या चटक्याने मणी करपण्याचा (सनबर्नचा) धोका निर्माण झाला आहे. भुरीपासून बागांचे नुकसान टाळण्यासाठी पहाटेच्या धुराटीसोबतच महागडय़ा औषधांचा मारा करावा लागत आहे. तासगाव, मिरज, खानापूर, पलूस, कडेगावमध्ये द्राक्ष पीक मोठय़ा प्रमाणावर असून सध्या या भागातील द्राक्ष पीक पक्वतेच्या मार्गावर आहे, तर काही द्राक्ष पिकांची बाजारपेठेत पाठवणी सुरू झाली आहे.

तुरीच्या पिकावर संकट

पश्चिम विदर्भात थंडीचा कडाका कायम असून त्यामुळे तुरीचे पीक वाळत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. साधारणपणे १० टक्के क्षेत्रावर त्याचा परिणाम झाल्याचा अंदाज आहे.

सलग दोन वर्षे चांगला भाव मिळाल्याने यंदा अमरावती विभागात तुरीचा पेरा वाढला. तुरीचे पीकही जोमदार आले आहे. सोयाबीन, मूग, उडिदाच्या भावाने भ्रमनिरास केल्याने शेतकऱ्यांच्या आशा तुरीच्या पिकावर होत्या, पण कडाक्याच्या थंडीमुळे यंदाही संकट निर्माण झाले आहे. दरवर्षीपेक्षा यंदा थंडीचा जोर अधिक आहे. त्यामुळे पिकांवर दवाळ पडून पीक वाळून जात असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रशासनाने सर्वेक्षणाचे आदेश दिले असून एकटय़ा अमरावती जिल्ह्यात १५ हजार हेक्टरातील तूर पिकाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सध्या किमान तापमान हे ७ ते ८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. १० अंशाखाली तापमान गेल्यास तुरीचे पीक अडचणीत येऊ शकते. दिवसाच्या तापमानात वाढ होत असून रात्री त्यात कमालीची घट होत आहे. तुरीच्या पिकाला या वातावरणासोबत जुळवून घेणे कठीण जाते. जोपर्यंत थंडीचा कडाका कायम आहे, तोपर्यंत तूर वाळण्याचा धोका कायम असल्याचे कृषीतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

द्राक्ष पिकावर थंडीमुळे भुरी या बुरशीजन्य रोगाचे आगमन झाले असून यामुळे मणी डागाळत आहेत. याचबरोबर रात्रीची थंडीची लाट सकाळी ९ पर्यंत राहात असून त्यानंतर दुपारी चटके देणारे उन पडत असल्याने याचा दुहेरी फटका सोनाका, थॉमसन जातीच्या द्राक्षाला बसत आहे. द्राक्ष मण्यामध्ये पाणी भरण्याची प्रक्रिया सुरू होताच उन्हाच्या चटक्याने द्राक्षमणी घडावरच करपत आहेत.    रवींद्र पाटील, द्राक्ष उत्पादक, बोलवाड, सांगली