मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारचे लवकरच खातेवाटप जाहीर होईल. शिवतीर्थावर झालेल्या ऐतिहासिक शपथविधी सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर शिवसेनेचे विधिमंडळातील गटनेते एकनाथ शिंदे, शिवसेना नेते सुभाष देसाई, राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात, विदर्भातील नेते नितीन राऊत यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली होती. पण कोणाला मिळणार कोणतं खातं हे अद्याप गुलदसत्यातच आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी रविवारी पुण्यात दिलेल्या माहितीनुसार हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी खातेवाटप होण्याची शक्यता आहे. मंत्री मंडळ विस्तार आणि खातेवाटप अंतिम टप्यात असल्याचे काँग्रेसचे प्रदेक्षाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी रविवारी शिर्डीमध्ये प्रसारमाध्यमांना सांगितले होते. त्यामुळे सर्वांच्या नजरा राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावर लागल्या आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असून या विस्तारात आणखी काही मंत्र्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते, असे सूत्रांनी सांगितले.

विधानसभेतील विश्वासदर्शक ठराव उद्धव ठाकरे सरकार मोठ्या मताधिक्क्याने जिंकले. बहुमतासाठी १४५ हा जादुई आकडा असताना महाविकास आघाडीकडे १६९ आमदारांचं बळ असल्याचंही यामुळे स्पष्ट झालं. ठाकरे सरकारने विधानसभेत बहुमताचा सामना एकतर्फी जिंकल्यानंतर आता ठरलेल्या अन्य बाबी प्रत्यक्षात उतरवण्याची लगीनघाई सुरू झाली आहे. त्यानुसारच हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांत खातेवाटपावरही एकमत झाल्याची खात्रीशीर सूत्रांची माहिती आहे.

असे असेल महाविकास आघाडीचं खातेवाटप?

शिवसेना
गृह, नगरविकास, परिवहन, उद्योग, सामाजिक न्याय, पर्यावरण,उच्च व तंत्रशिक्षण

राष्ट्रवादी
वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, कृषी, सार्वजनिक आरोग्य, सहकार, सार्वजनिक बांधकाम, वन

काँग्रेस
महसूल, ऊर्जा, जलसंपदा, आदिवासी विकास, वैदकीय शिक्षण, शालेय शिक्षण, महिला व बालकल्याण