“महाराष्ट्रात सरकारविरोधात काही बोललं तर तुरुंगात टाकलं जातं, महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी आहे असा आरोप आमच्यावर झाला. मग ईडी आणि इतर तपास यंत्रणांचा वापर तुम्ही कसा करत आहात? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रातल्या सत्ताधारी भाजपाला विचारला.

“प्रताप सरनाईकांच्या मागे ईडीचा ससेमिरा लावला. त्यांच्या मुलांचीही चौकशी केली. नशीब त्यांना नातू झालेला नाही नाहीतर त्याच्याही मागे ईडी चौकशी लावली असती किंवा उद्या सांगतीलही की प्रताप सरनाईकांना नातू झाला तर आधी इथे घेऊन या. हे सगळं काय आहे? ही विकृतीच आहे. असं विकृत राजकारण आम्ही करत नाही” असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

मागच्या पाच वर्षांमध्ये कुंडल्या बघणारे आणि मागच्या वर्षभरात सरकार पाडण्याचा मुहूर्त पाहणारे आता पुस्तकं आणि अहवाल वाचू लागले आहेत ही चांगली गोष्ट आहे असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षभरातल्या कामाच्या पुस्तकाचे संदर्भ देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यावरुन उद्धव ठाकरेंनी हा टोला लगावला आहे.