मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला आज (सोमवारी) १० वर्षे पूर्ण होत असतानाच शहिदांना मानवंदना देण्याचा विसर राज्य सरकारला पडल्याची टीका विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सोमवारी केली. सरकारच्या असंवेदनशीलतेचं आणखी एक उदाहरण समोर आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु असून सोमवारी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला १० वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर सरकारतर्फे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना आणि मृत्यमुखी पडलेल्या लोकांना सभागृहात आदरांजली अर्पण करणे अपेक्षित होते. मात्र तसे न करताच विधानसभेचे कामकाज सुरू करण्यात आले. यावर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

विरोधी पक्षांनी यावर आक्षेप घेत शहिदांना सभागृहात मानवंदना देण्यात यावी अशी मागणी केली. २६/११चा हल्ला अत्यंत क्रुर आणि दुर्दैवी होता. सरकारने जवानांच्या व मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या प्रती सद्भावना व्यक्त करावी अशी मागणी अजित पवार यांनी केली. शेवटी विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे सरकारने मागणी मान्य करत सभागृहात शहिद जवानांना तसेच मृत्युमुखी पडलेल्या लोकांना मानवंदना दिली.

वांद्रेतील झोपडपट्टीला लागलेल्या आगीत समाजकंटकांचा हात होता का? : आ. हेमंत टकले
मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील नर्गिसदत्तनगर झोपडपट्टीला लागलेल्या आगीमध्ये समाजकंटकांचा हात होता का आणि त्यांनी जाणीवपूर्वक हे षडयंत्र रचले होते का याची चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेमधील आमदार हेमंत टकले यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून केली. २००३ पासून याठिकाणी किती आगी लागल्या आणि अरुंद रस्ते आहेत तर मुंबई महानगरपालिकेने काय कार्यवाही केली, एकूणच मुंबईतील झोपडपट्टयांमध्ये किती लोकांचे लागेबांधे आहेत, आगी वारंवार लागल्या जात आहेत की समाजकंटकांकडून लावल्या जात याची चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली.