राज्यात करोनाचं संकट उभं आहे. राज्य सरकार सर्वोतोपरी करोनाचा प्रसार थांबवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचं दिसत आहे. तर दुसरीकडं राज्य सरकारनं पॅकेज जाहीर करावं, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षाकडून केली जात आहे. पॅकेज जाहीर करण्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. पॅकेज जाहीर करण्यामागील कारणांचा उहापोह ही त्यांनी गुरूवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला.

महाराष्ट्राच्या हीरक महोत्सवानिमित्त ‘लोकसत्ता’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘साठीचा गझल.. महाराष्ट्राचा’ या वेबसंवाद कार्यक्रमाची सांगता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीने झाली. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील सर्वांगीण परिस्थितीवर भाष्य केलं. मुख्यमंत्री म्हणाले,”पुढील १०-१५ दिवस काळजीचे आहेत. राज्यातील आणि मुंबईतील रुग्णांची संख्या शिखरावर असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. ती सध्या पोहोचली आहे की, पोहोचणार आहे, हे अजून कळालेलं नाही. पण रुग्णसंख्येच्या उच्चाकांनंतर हळूहळू करोनाची रुग्णसंख्या कमी होत जाईल. त्यासाठी राज्य सरकार पूर्ण तयारी करीत आहे. केंद्राचं पथक वारंवार पाहणी करत आहे. त्यांनी रुग्णांची संख्या वाढणार आहे, अशी भीती त्यावेळी दाखवली नसती तर व्यक्त केलेल्या आकडेवारी इतकी रुग्णसंख्या महाराष्ट्रात असती. पण राज्य सरकारनं वेळीच दक्षता घेतली आणि त्यामुळे रुग्णांची संख्या कमी आहे. काही प्रमाणात कम्युनिटी ट्रान्समिशनही झालं आहे. हे अमान्य करता येणार नाही. पूर्वी कंटेनमेंट झोनची व्याप्ती तीन किमी परिघाची होती. आता त्याची व्याप्ती कमी करण्यात आली आहे,” असं मुख्यमंत्री म्हणाले.

“देशात लॉकडाउन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत पाच वेळा बैठका घेतल्या. मागील बैठकीत त्यांनी सर्व राज्यांना पॅकेज जाहीर न करण्याचं आवाहन केलं. पंतप्रधानांनी सांगितलं होतं की. केंद्राची आणि राज्याची स्थिती सध्या चांगली नाही. पुढील परिस्थितीचा आताच अंदाज येऊ शकत नाही. त्यामुळे गोंडस वाटणाऱ्या घोषणा करू नका, असं ते म्हणाले होते. त्यामुळे राज्य सरकार प्रत्यक्ष मदत करत आहे,” असं भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पॅकेजसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर मांडली.