News Flash

पालकमंत्री देशमुख अटक प्रकरणी घूमजाव ; नामुष्की टाळण्यासाठी शासनाचा आटापिटा

पूर्व नियोजित ठरल्यानुसार हैदराबाद महामार्गावर पालकमंत्री देशमुख हे आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी गेले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यातील ताईत बनलेले सोलापूरचे धडाकेबाज जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या विरोधात पालकमंत्री विजय देशमुख हे रस्त्यावर आले आणि स्वतला अटक करवून घेण्यापर्यंत त्यांच्यावर पाळी आली खरी; परंतु यात नामुष्की होऊ नये म्हणून शासनाने पालकमंत्र्यांना अटक झालीच नव्हती, असा खुलासा केला आहे. परंतु स्थानिक पोलीस प्रशासन तोंडघशी पडल्याचे दिसून आले.
कोणत्याही दबावाला बळी न पडता कामांचा धडाका लावणारे कार्यक्षम जिल्हाधिकारी मुंढे यांनी पुढील महिन्यात होणाऱ्या ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेसाठी आपत्ती व्यवस्थापन नियोजित आराखडा राबविण्याची तयारी चालविताना सिद्धेश्वर मंदिर समितीने त्यास कडाडून विरोध दर्शवित आंदोलन हाती घेतले आहे. सिद्धेश्वर यात्रेतील मानकरी असलेले पालकमंत्री देशमुख हे या आंदोलनाचे नेतृत्व करीत आहेत. सुरुवातीला मोर्चा व ‘सोलापूर बंद’ पाळूनही जिल्हाधिकारी मुंढे हे दाद देत नाहीत म्हणून गेल्या रविवारी विविध पाच ठिकाणी ‘रास्ता रोको’ आंदोलन घोषित केले गेले. पूर्व नियोजित ठरल्यानुसार हैदराबाद महामार्गावर पालकमंत्री देशमुख हे आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी गेले. तेथे सुमारे शंभर सिद्धेश्वर भक्तांच्या सहभागातून पालकमंत्री देशमुख यांनी आंदोलनाचे स्वरूप बदलत ‘रास्ता रोको’ ऐवजी त्याहून तीव्र अशा ‘जेल भरो’ आंदोलनाची घोषणा केली. शांतपणे आंदोलन सुरू झाले. तेव्हा नेहमीप्रमाणे पोलिसांनी हस्तक्षेप करून पालकमंत्री देशमुख यांच्यासह सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन पोलीस वाहनातून पोलीस मुख्यालयात नेले. त्या वेळी आंदोलनस्थळी पोलीस उपायुक्त बाळसिंग रजपूत यांनी पालकमंत्र्यांसह सर्व आंदोलकांना अटक केल्याचे प्रसार माध्यमांसमोर जाहीर केले होते. दरम्यान, शहरात ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनात पकडण्यात इतर आंदोलकांनाही पोलीस मुख्यालयातच आणण्यात आले होते. नंतर थोडय़ाच वेळात पालकमंत्री देशमुख यांच्यासह सर्वाना सोडून देण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात खुद्द पालकमंत्रीच आंदोलन करून स्वतला अटक करवून घेतल्यामुळे महायुती शासनाची एकीकडे नाचक्की होत असताना स्थानिक पोलिसांवर अटक कारवाईचा पवित्रा बदलून पालकमंत्र्यांना अटक केली नसल्याचा खुलासा करण्याचा प्रसंग गुदरला. तर दुसरीकडे पोलीस उपायुक्त रजपूत यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे जेल भरो आंदोलनात पालकमंत्री देशमुख यांच्या अटकेचे वृत्त प्रसिद्ध झाल्याच्या पाश्र्वभूमीवर त्याचे पडसाद नागपूर विधिमंडळ अधिवेशनात उमटले असता मुख्यमंत्री फडणवीस यांना शासनाची बूज राखण्यासाठी सोलापुरातील आंदोलनात पालकमंत्री देशमुख हे गेले असले तरी त्यांना पोलिसांनी अटक केली नाही, असा निर्वाळा द्यावा लागला. काहीही गडबड होऊ नये म्हणून पालकमंत्री देशमुख हे आंदोलनात गेले होते. आंदोलकांसोबत पालकमंत्री पोलिसांच्या वाहनात बसले होते. यामागे त्यांचा हेतू अटक करवून घ्यावयाचा नव्हता तर आंदोलकांना ‘शांत’ करण्याचा होता, असेही फडणवीस यांना सांगावे लागले. मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिल्याप्रमाणे पालकमंत्री देशमुख हे सिद्धेश्वर भक्तांना ‘शांत’ करण्यासाठी आंदोलनस्थळी गेले होते, अशी वस्तुस्थिती नव्हती. प्रत्यक्षात पूर्वनियोजित ठरल्यानुसार पालकमंत्री आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी त्यांनी स्वत ‘जेल भरो’ ची घोषणा केली होती.
या घोषणेचे वृत्तवाहिन्यांनी चित्रीकरण केले आहे. तसेच नंतर पोलीस उपायुक्त रजपूत यांनी पालकमंत्र्यांसह सर्व आंदोलकांना अटक केल्याच्या विधानाचेही चित्रीकरण झाले आहे. मात्र नंतर पोलीस प्रशासनासह शासनाने नामुष्की टाळण्यासाठी घूमजाव केल्याचे मानले जात आहे.
पालकमंत्री देशमुख यांना अटक करण्यात आली नसल्याचे अधिकृतपणे सांगितले जात असले तरी यापूर्वी गेल्या ७ डिसेंबर रोजी सिद्धेश्वर मंदिर समितीने जिल्हाधिकारी मुंढे यांच्या विरोधात पुकारलेला ‘सोलापूर बंद’ आणि काढलेल्या मोर्चाचे नेतृत्व पालकमंत्री देशमुख यांनीच राजकीय प्रतिष्ठा पणाला लावून केले होते.
मुख्यमंत्र्यांच्या खास मर्जीतील समजल्या जाणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात पालकमंत्री रस्त्यावर उतरणे, यात होणारी नामुष्की कोणाची, पालकमंत्रिपदाची अप्रतिष्ठा झाली नाही काय, असा सवाल सुजाण नागरिक व कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2015 12:14 am

Web Title: maharashtra government denied about guardian minister vijay deshmukh arrest
Next Stories
1 अधिवेशनातून : ‘माझा पॉइंट, तुमची ऑर्डर’
2 मुंबई बंदर बंद करण्याचा घाट
3 जैतापूर प्रकल्पाविरोधात शिवसेना आक्रमक होणार
Just Now!
X