देश स्वतंत्र झाल्यावर वनवासी समाजाच्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी सरकारची होती. शासन केवळ घोषणा करते. पण प्रत्यक्षात वनवासी भागात सरकारी सुविधा मात्र पोहोचत नाहीत. शाळा तयार होते. शिक्षक नियुक्त होतात. मात्र ते शिक्षक शाळेत येत नाहीत. शासनाने दवाखाने बांधले. मात्र तिथे वैद्यकीय अधिकारी नाहीत. अशी एकूण स्थिती असताना वनवासी बांधवांच्या आरोग्याचे रक्षण कोण करणार, असा प्रश्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी केला. वनवासी कल्याण आश्रम षष्ठब्दी पूर्ती आणि संस्थापक बाळासाहेब देशपांडे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने रविवारी येथे वनवासी जनजाती संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.
उंटवाडी येथे झालेल्या या संमेलनास सिंहस्थ समितीचे उपाध्यक्ष आणि दिगंबर आखाडय़ाचे प्रमुख महंत भक्तीचरणदास, वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष लक्ष्मणराव टोपले, स्वागत समिती अध्यक्ष, डॉ. आशुतोष माळी, स्वागत समितीचे सचिव डॉ. बी. जी. काळे, वनवासी कल्याण आश्रमाचे जिल्हाध्यक्ष डॉ. भरत केळकर आदी उपस्थित होते.
जोशी यांनी वनवासी बांधवांच्या धर्मातराच्या मुद्यावर बोट ठेवले. परकीय शक्तींनी वनवासी बांधवांना आपल्या समाजापासून दूर लोटण्याचा प्रयत्न केला आहे.
धर्मातराच्या रुपाने आपल्यासमोर असणाऱ्या संकटांचा सामना करताना दुर्बल होता कामा नये, असे आवाहनही त्यांनी केले.
महाराष्ट्र प्रांताचे सचिव नागेश काळे यांनी प्रास्तविकात वनवासी कल्याण आश्रमाने जन्मशताब्दी निमित्त केलेल्या संकल्पाविषयी माहिती दिली. महाराष्ट्रात ८०० हून अधिक आरोग्य रक्षकांमुळे चार लाख वनवासी बांधव दरवर्षी औषधोपचार घेत आहेत. महाराष्ट्र प्रांतात एकूण १६०० हून अधिक प्रकल्प वनवासी भागात कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. महंत भक्तीचरणदास यांनी वनवासी समाजाचा अध्यात्मिक वारसा हा अगदी पुराणकाळापासून असून डोंगर दऱ्यात राहणारे हे वनवासी बांधव आपली संस्कृती आणि परंपरा जोपासणारे असल्याचे नमूद केले. आश्रमाचे महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष लक्ष्मण टोपले यांनी वनवासी समाज जीवनात असणारा संघर्ष मांडत वनवासी बंधूंनी आपला स्वाभिमान आणि विकास करण्यासाठी प्रयत्नरत राहण्याचे आवाहन केले. याप्रसंगी डॉ. प्रसन्नकुमार सप्रे लिखीत ‘भारत के विकास मे वनवासी जनजाती का योगदान’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात ‘आम्ही धर्मातर करणार नाहीत आणि ज्यांनी धर्मातर केले आहे त्यांचे पुन्हा हिंदू धर्मामध्ये स्वागत करू’ असा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला.