पाणीटंचाईच्या ठिकाणी तत्काळ पाणी देण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून, कराड तालुक्यातील कोणत्याही गावात पाणीटंचाई भासू देणार नाही, मागेल त्या गावाला कोणत्याही परिस्थितीत पाणी देण्याच्या सक्त सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालकल्याण, अन्न व नागरीपुरवठा राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी दिली.
कराड तालुक्यातील टंचाई दौरा केल्यानंतर ठाकूर यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्या वेळी त्या बोलत होत्या. भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, प्रांताधिकारी किशोर पवार, तहसीलदार राजेंद्र शेळके, गटविकास अधिकारी अविनाश फडतरे, पाणीपुरवठा उपअभियंता महेश आरळेकर, टेंभू योजना पाटबंधारेचे अधिकारी उपस्थित होते.
विद्या ठाकूर म्हणाल्या, की मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. त्यांच्या सूचनेनुसार राज्यातील सर्व तालुक्यांतील परिस्थिती समजावून घेण्यासाठी मंत्री, खासदार, आमदारांचे दौरे सुरू आहेत. त्यातूनच त्यांनी टँकरने लातूरला पाणी दिले.
सरकारचा लोकांशी थेट संवाद होऊन त्यांच्या समस्या जाणून घेता येतील या हेतून दौरा केला. त्यातून कराड तालुक्यातील १० गावांना भेट देऊन लोकांशी चर्चा केली.
शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोचत आहेत का, याचीही माहिती घेतली. टंचाईग्रस्त गावातील लोकांनी अनेक प्रश्न मांडले. त्यावर तोडगा काढण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
यंदा चांगला मान्सून होईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. जलयुक्त शिवारमधून झालेल्या कामांमध्ये यंदा भरपूर पाणीसाठा अपेक्षित असल्याचे त्या म्हणाल्या.