पोलिओ निर्मूलनानंतर देशाला गोवर-रुबेला आजारांपासून मुक्त करण्यासाठी राज्यात महत्वाकांक्षी अशी गोवर-रुबेला लसीकरण मोहीम सुरू आहे. या लसीकरणाचा लाभ बालकांना त्यांच्या पालकांनी द्यावा असे आवाहन आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी केले. दीपक सावंत सोमवारी औरंगाबाद दौऱ्यावर होते. यावेळी शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत डॉ.सावंत बोलत होते.

डॉ.सावंत म्हणाले की, आजपर्यंत लसीकरणाचा दुष्परिणाम झालेला नाही. गोवर-रुबेला लस प्रत्येक बालकाच्या सुदृढ भविष्यासाठी आवश्यक आहे. याकरिता सर्व समाजाने पुढाकार घेऊन या लसीकरणाचा लाभ आपल्या पाल्यांना द्या.  आपले पाल्य या लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्यावी. ही मोहीम नसून यास चळवळीचे रुप यावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी जिल्हा आरोग्य संघटनेचे डॉ.मुजीब सय्यद यांनी मराठवाड्यातील गोवर-रुबेला लसीकरणाबाबत सविस्तर माहिती डॉ.सावंत यांना दिली. तर औरंगाबाद महानगर पालिकेतर्फे गोवर-रुबेला लसीकरणासाठी देण्यात आलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यात येणार असल्याचे आश्वासन महापौर घोडेले यांनी दिले.