कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात विधान परिषदेसाठी उमेदवारी डावलण्याचा प्रकार

विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दत्ताजीराव मसुरकर इच्छुक होते. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज घेण्याची सूचना त्यांना करण्यात आली होती. मात्र आयत्या वेळी अनिकेत सुनील तटकरे यांना उमेदवारी दिल्याचे पक्षाकडून जाहीर करण्यात आले. दिलेला शब्द न पाळण्याची ही रायगड जिल्ह्यातील पहिली घटना नाही. यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळेच महेंद्र दळवी, राजीव साबळे, शाम भोकरे, आणि सुरेश टोकरे पक्ष सोडून गेले आहेत. आता मसुरकरांच्या बाबतीतही तेच घडल्याने राष्ट्रवादीचे राजकारण नेमके कुठल्या दिशेने जात आहे याची चर्चा सुरू झाली आहे.

रायगड जिल्ह्यात एके काळी राष्ट्रवादी काँग्रेस हा क्रमांक एकचा पक्ष मानला जायचा. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून सर्वाधिक उमेदवार पक्षाचे निवडून यायचे, मात्र पक्षांतर्गत एकाधिकारशाहीमुळे नंतरच्या पक्षाला मोठी गळती लागली. याची मोठी किंमत जिल्हा परिषद आणि नगर पालिका निवडणुकांमध्ये पक्षाला चुकवावी लागली. महेंद्र दळवी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक होते. मात्र ऐन वेळी त्यांना डावलून सुरेश टोकरे यांना उमेदवारी दिली गेली. नाराज झालेल्या दळवी यांनी शिवसेनेची वाट धरली, राजीव साबळे श्रीवर्धन मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. पण त्यांनाही दिलेला शब्द पाळला गेला नाही. शाम भोकरे यांना जिल्हा परिषदेचे सभापतिपद देण्याचा शब्दही पाळला गेला नाही. सुरेश टोकरे यांना कर्जत विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी हवी होती, ती नाकारली गेली. त्यामुळे या सर्वानी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला.

झालेल्या चुकांमधून पक्षाने बोध घेणे गरजेचे होते, मात्र तसे झाल्याचे दिसून येत नाही. कोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी पक्षाकडून दत्ताजीराव मसुरकर यांना तयारी सुरू  करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार त्यांनी रत्नागिरी येथे जाऊन उमेदवारी अर्जही आणला होता. मात्र अचानक अनिकेत तटकरे यांना उमेदवारी दिल्याचे जाहीर करण्यात आले. खोपोली नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष असलेले मसुरकर हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ  नेते म्हणून ओळखले जातत. पक्षस्थापनेपासून त्यांनी एकनिष्ठेने पक्षाचे काम केले. राज्यातील नगराध्यक्षांच्या समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले. शांत आणि संयमी स्वभावामुळे त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यामुळे अनिल तटकरे नंतर कोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी पक्षाचे प्रबळ दावेदार मानले जात होते.

मात्र त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला डावलून नुकत्याच राजकारणात सक्रिय झालेल्या अनिकेत तटकरे यांना पक्षाकडून आयत्या वेळी उमेदवारी जाहीर केली. यामुळे मसुरकर यांना धक्का बसला. त्यामुळे राजगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकारण नेमके कुठल्या दिशेने चालले आहे याची चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल तटकरे यांना पुन्हा एकदा ही निवडणूक लढवण्याची इच्छा होती. त्यांनी पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन आपली इच्छा व्यक्तही केली होती. तसेच आपणास उमेदवारी देणे शक्य नसल्यास पक्षातील ज्येष्ठ नेते म्हणून मसुरकर यांच्या नावाचा विचार व्हावा असेही सूचित केले होते. मात्र तरीही मसुरकर यांना शेवटच्या क्षणी डावलण्याचा निर्णय घेण्यात आला.

आयत्या वेळी मला उमेदवारी का नाकारली गेली हे माहीत नाही. हा निर्णय माझ्यासाठी धक्कादायक होता. पक्षनेतृत्वाशी याबाबत मी चर्चा करणार आहे. त्यानंतरच पुढची प्रतिक्रिया देईन.

दत्ताजाराव मसुरकर, ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस