News Flash

विधान परिषद निवडणूक : भाजपला धक्का

पुणे आणि नागपूर गमावले, सहापैकी चार जागा महाविकास आघाडीला 

पुणे आणि नागपूर गमावले, सहापैकी चार जागा महाविकास आघाडीला 

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनंतर नागरिकांतून झालेल्या पहिल्याच निवडणुकीत भाजपचा पार धुव्वा उडाला. विधान परिषदेच्या सहापैकी चार जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. नागपूर आणि पुणे या आपल्या पारंपरिक पदवीधर मतदारसंघांमध्ये भाजपचा पराभव झाला.

ही निवडणूक शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्रित लढले. नागपूर, पुणे आणि औरंगाबाद या तिन्ही पदवीधर मतदारसंघांत राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीने विजय मिळवला. यापैकी नागपूर आणि पुणे पदवीधर मतदारसंघ भाजपकडे होते. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील निवडणुकीला सार्वत्रिक निवडणुकीचे स्वरूप आले होते. दोन्ही बाजूने मोठय़ा प्रमाणावर पैशांचे वाटप झाल्याचे आरोप होत आहेत. याशिवाय, या निवडणुकीला जातीय वळणही मिळाले होते.

करोना संकटामुळे महानगरपालिकांसह सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. परंतु टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी पहिलीच निवडणूक विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या माध्यमातून झाली.

नागपूर पदवीधर मतदारसंघाची रचना झाल्यापासून जनसंघ आणि नंतर भाजपने हा मतदारसंघ पारंपरिकदृष्टय़ा आपल्याकडे कायम राखला होता. परंतु काँग्रेसने यंदा तो प्रथमच जिंकला. नागपूर या गडातच भाजपचा १८ हजारांहून अधिक मतांनी पराभव झाला. नागपूरमध्ये माजी आमदार अनिल सोले यांच्याऐवजी संदीप जोशी यांना उमेदवार मिळवून देण्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला होता. काँग्रेसचे विजयी उमेदवार अभिजित वंजारी यांनी मतदार नोंदणीपासून प्रचार यंत्रणेत आघाडी घेतली होती. त्याचा त्यांना फायदा झाला. भाजपमध्ये शेवटपर्यंत उमेदवारीचा घोळ घातला गेला. पदवीधरांनी प्रथमच नागपूरमध्ये भाजपला नाकारले. जिल्हा परिषदेपाठोपाठ पदवीधर मतदारसंघही गमवावा लागल्याने नागपूरमध्ये भाजपसाठी सारे काही आलबेल नाही, हेच स्पष्ट झाले.

पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीचे अरुण लाड सुमारे ४९ हजार मतांनी विजयी झाले. पुणे मतदारसंघातून गेल्या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील विजयी झाले होते. या वेळी भाजपने आपल्या जुन्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याचे टाळून बाहेरून आलेल्या संग्राम देशमुख यांना रिंगणात उतरविले होते. परंतु हा प्रयोग फसला. या निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादीने आपली सर्व यंत्रणा उतरवली होती, तर भाजपने संपूर्ण मतदारसंघ ढवळून काढला होता. परंतु नागपूरप्रमाणेच हाही पारंपरिक मतदारसंघ भाजपला गमवावा लागला.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण ५८ हजार मतांनी विजयी झाले. त्यांनी आमदारकीची  ‘हॅट्ट्रिक’ साधली. उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजीनाटय़ रंगले होते. त्यातच मतांचे जातीय ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न मोठय़ा प्रमाणावर झाला. हा मतदारसंघ कायम राखून राष्ट्रवादीने मराठवाडय़ात आपली पकड भक्कम के ली. त्याचा फायदा औरंगाबाद महापालिका निवडणुकीत होऊ शकतो.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र निवडणूक लढवल्याने मतविभाजन टळले. त्याचा फायदा त्यांना झाला. लवकरच होणाऱ्या नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीसह पाच महापालिका आणि पुढील वर्षी होणाऱ्या मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे आदी महापालिका आणि नगरपलिकांच्या निवडणुकीत ‘महाविकास आघाडी’ म्हणून लढण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी के ली आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे जयंत आसगावकर, तर अमरावती शिक्षक मतदारसंघात अपक्ष किरण सरनाईक यांचा विजय झाला. अमरावतीची जागा शिवसेनेला गमवावी लागली. शिवसेनेने लढविलेली एकमेव जागाही गमवावी लागल्याने भाजपने चिमटा काढला आहे.

धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे अमरिश पटेल विजयी झाले असले तरी तो पक्षापेक्षा पटेल यांचा व्यक्तिगत विजय मानला जातो.

फडणवीस, पाटील अपयशी

नागपूर आणि पुण्याच्या जागा अनुक्र मे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिष्ठेच्या के ल्या होत्या. दोन्ही मतदारसंघांत भाजपचा मोठय़ा मतसंख्येने पराभव झाला. महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरल्याची टीका फडणवीस आणि पाटील गेले वर्षभर सातत्याने करीत होते, परंतु त्यांनी प्रतिष्ठेच्या के लेल्या मतदारसंघांतच महाविकास आघाडीला यश मिळाले.

पदवीधरांची २३ हजार मते बाद

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात २३ हजार मते बाद झाली. पदवीधरांनी जागरूकपणे मतदान करावे, अशी अपेक्षा, परंतु मराठवाडय़ातील २३ हजार पदवीधर मतदारांनी चुकीच्या पद्धतीने मतदान के ल्याने त्यांची मते बाद ठरली.

नागपूरमध्ये अपयशमालिका

नागपूर हा भाजपचा बालेकिल्ला, परंतु त्याचे बुरूज ढासळू लागले आहेत. तेथे भाजपला अपयश येऊ लागले आहे. विधानसभा निवडणुकीत शहर आणि जिल्ह्य़ात भाजपची पीछेहाट झाली. त्यानंतरच्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचा पराभव करून काँग्रेसने सत्ता मिळवली. वर्षभरातच नागपूर पदवीधर मतदारसंघही गमवावा लागला.

पुणे, नागपूर आणि औरंगाबादमध्ये मिळालेल्या विजयामुळे शेतकरी, कामगार कष्टकरी, मध्यमवर्गीयांसह उच्चशिक्षित आणि पदवीधर मतदारही महाविकास आघाडीबरोबर असल्याचे स्पष्ट झाले. – जयंत पाटील,

प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 5, 2020 4:03 am

Web Title: maharashtra mlc election results 2020 4 out of 6 seats won by maha vikas aghadi
Next Stories
1 मराठा आरक्षणप्रकरणी घटनापीठ स्थापन
2 शिक्षकांचे महत्त्व जनमानसात रुजणे महत्त्वाचे!
3 Maharashtra MLC election results 2020 analysis : गलीत घाटाखाली दिवाळी आणि घाटावर सन्नाटा!
Just Now!
X