28 February 2020

News Flash

मनसेचा नवा झेंडा पाहिलात का? स्थापनेनंतर १४ वर्षांनी बदलणार झेंड्याचा रंग

महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोठे बदल करण्याच्या तयारीत असून उद्या म्हणजेच २३ जानेवारीला होणाऱ्या महाअधिवेशनात पक्षाची पुढील वाटचाल ठरवली जाणार आहे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोठे बदल करण्याच्या तयारीत असून उद्या म्हणजेच २३ जानेवारीला होणाऱ्या महाअधिवेशनात पक्षाची पुढील वाटचाल ठरवली जाणार आहे. या महाअधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे काही मोठे बदल करणार असून पक्षाचा झेंडाही बदलणार असल्याचं बोललं जात आहे. पक्षाने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली तरी गेल्या काही दिवसांतील घडामोडीवरुन तसे संकेत मिळत आहे. मनसेच्या नव्या झेंड्यात फक्त भगवा रंग असणार असून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असणार असल्याचं कळत आहे. या झेंड्याचा फोटोही समोर आला आहे. मात्र पक्षाने अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

मनसेकडून दोन झेंडे तयार करण्यात आल्याचं समजत आहे. हे दोन्ही प्रस्तावित झेंडे निवडणूक आयोगाला पाठवण्यात आले आहेत. एका झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असून दुसऱ्यावर निवडणूक चिन्ह इंजिन असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या दोन्ही झेंड्यांवर भगवा रंग कायम असणार असल्याचं सांगितलं जात आहे. मनसेच्या सध्याच्या झेंड्यात भगवा, निळा आणि हिरवा रंग आहे. मात्र आता हा झेंडा बदलला जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे .

महाअधिवेशनात अनेक राजकीय ठराव संमत केले जाणार असून राज ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी पक्षाची पुढील वाटचाल ठरवली जाणार आहे अशी माहिती मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिली आहे.

ट्विटर हँडलवरुन हटवला झेंडा
मनसे अधिकृत या ट्विटर हँडलवरुन पक्षचिन्हाच्या मागे असलेला झेंडा हटवण्यात आला आहे. त्या ठिकाणी आता फक्त रेल्वे इंजिनच दिसत आहे. त्यामुळे निळा, भगवा आणि हिरवा असे तीन रंग असलेला मनसेचा झेंडा बदलणार हे निश्चित असल्याची चर्चा आहे.

कसा असेल नवा झेंडा?
पक्षाचा सध्याच्या झेंड्यातील चार रंगाऐवजी नवा झेंडा एकाच रंगाचा असेल. भगव्या किंवा केशरी रंगाच्या या झेंड्यावर राजमुद्राही असेल असे समजते. राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाला केवळ एका जागी यश मिळाल्यामुळे मनसे आता हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेणार असल्याची चर्चा आहे. राज्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये स्थानिक हिंदुत्ववादी पक्षाची उणीव भरुन काढण्याच्या दिशेने राज या विचार करत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. याच पार्श्वभूमीवर ‘सर्वसामावेश’ विचारधारेतून तयार करण्यात आलेल्या मनसेच्या सध्याच्या झेंड्याऐवजी भगव्या झेंड्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे समजते.

हिंदुत्वाचा मुद्दा का?
मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरेंनी शिवसेनेप्रमाणेच मराठीचा मुद्दा हाती घेतला होता. यामध्ये दुकानांवरील पाट्या मराठीत करण्याचे मनसेचे आंदोलन चांगलेच गाजले होते. मात्र त्यानंतर कोणत्याच निवडणुकांमध्ये मराठीचा मुद्दा तितकासा प्रभाव पाडू शकला नाही. त्यामुळे आता मराठीच्या ऐवजी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन राजकारण करण्याचा मनसेचा विचार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर राज्यात सत्ता स्थापन करणाऱ्या शिवसेनेच्या मतदारांना या मुद्द्याच्या आधारावर आकर्षित करण्याचा मनसेचा विचार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे.

First Published on January 22, 2020 9:21 am

Web Title: maharashtra navnirman sena flag raj thackeray sgy 87
Next Stories
1 योगेश सोमण यांची पात्रताच नव्हती – अनिल देशमुख
2 सांगलीमध्ये तीन ठिकाणी शिवभोजन केंद्र
3 रेल्वे मालवाहतूक मार्गासाठी राखेचा भराव
Just Now!
X