मागील काही दिवसांपासून राज्यातील करोना रुग्णांचा आलेख सतत चढताच असून करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सभा, समारंभांवर बंदी, ५० टक्के च कार्यालयीन उपस्थिती, विवाह समारंभाला फक्त ५० तर अंत्यविधीसाठी २० जणांच्या उपस्थितीस परवानगी देण्यात आलीय. देशभरामध्ये दिवसभरात सापडणाऱ्या नव्या करोना रुग्णांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे चित्र मागील काही दिवसांमध्ये दिसून आलं आहे. याच पार्श्वभूमीवर उद्योजक आनंद महिंद्रा यांनी पंतप्रधान कार्यालय आणि देशाचे आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे महाराष्ट्रात सरसकट लसीकरणाला परवानगी देण्यात यावी अशी इच्छा व्यक्त केलीय.

सोशल नेटवर्किंगवर सक्रीय असणाऱ्या महिंद्रा यांनी ट्विटरवरुन पंतप्रधान कार्यालय आणि केंद्रीय अरोग्यमंत्र्यांना टॅग करत महाराष्ट्र हे राज्य आर्थिक दृष्ट्या अंत्यंत महत्वाचं असून सध्याची करोना रुग्णांची वाढ पाहता महाराष्ट्रापुरतं तरी सरसकट लसीकरण करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी केलीय. “रोज सापडणाऱ्या नव्या रुग्णांपैकी अर्ध्याहून अधिक महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्र राज्य हे देशाच्या आर्थिक क्षेत्राच्या केंद्रस्थानी आहे. आणखीन लॉकडाउन राज्याला आर्थिक दुष्ट्या कमकुवत करणारे ठरतील. त्यामुळेच ज्यांना ज्यांना लस घेण्याची इच्छा आहे अशा सर्वांना लसीकरणाची तातडीची परवानगी देण्याची गरज महाराष्ट्रात आहे. लसींची कमतरता नाहीय,” असं ट्विट महिंद्रा यांनी केलं आहे. या ट्विटमध्ये पंतप्रधान कार्यालय आणि हर्षवर्धन यांना टॅग केलं आहे.

३१ मार्चपर्यंत निर्बंध…

करोनाचे रुग्ण वाढू लागल्याने स्वयंशिस्त पाळा, अन्यथा टाळेबंदी लागू करण्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्याच महिन्यात दिला होता. मात्र, राज्य सरकारने सरसकट टाळेबंदी करण्याऐवजी कठोर निर्बंध लागू के ले आहेत. ३१ मार्चपर्यंत हे सारे निर्बंध लागू राहतील, असा आदेश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काढला. करोना रुग्ण वाढल्यास टाळेबंदी अथवा कठोर निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारने यापूर्वीच स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. गर्दी कमी करण्यावर सरकारने भर दिलाय.

५० टक्के  उपस्थितीस परवानगी…

सर्व कार्यालये व आस्थापनांमध्ये ५० टक्के  उपस्थितीस परवानगी देण्यात आली आहे. शक्यतो घरून काम करण्यावरच भर देण्याची सूचना करण्यात आली आहे. या आदेशाचा भंग करणारी कार्यालये करोना महासाथ आटोक्यात येईपर्यंत बंद करण्यात येतील, असे कठोर पाऊल सरकारने उचलले आहे. सध्या खासगी तसेच सरकारी कार्यालयांमध्ये १०० टक्के  उपस्थिती असल्याने गर्दी वाढली आहे.

सोमवारी रुग्णवाढ १५ हजारांच्या घरात

राज्यात सोमवारी करोनाच्या १५,०५१ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ४८ रुग्णांचा मृत्यू झाला. नागपूर शहरात दिवसभरात दोन हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळले. दिवसभरात मुंबई १७१३, नागपूर २०९४, पुणे ११२२, पिंपरी-चिंचवड ६९८, उर्वरित पुणे जिल्हा ३६३, नाशिक ६७१, जळगाव जिल्हा ५००, औरंगाबाद ६५७, अमरावती शहर २२७, वर्धा ३४५ रुग्ण आढळले. पुणे जिल्ह््यात सर्वाधिक म्हणजे २६ हजारांपेक्षा अधिक उपचाराधीन रुग्ण आहेत.