चिपळूण शहरात पावसाचा जोर कायम असल्याने दुपारीही पूरपरिस्थिती कायम आहे. पाण्याची पातळी वाढत आहे. मुसळधार पावसामुळे शहरात दोन बळी गेल्याची प्राथमिक माहिती आहे. एक महिला पाण्यात बुडाली असून दुसरी वाहून गेल्याची माहिती आहे.

एकविरा मंदिर परिसरात राहणाऱ्या एका कुटूंबाला पुराच्या पाण्यातून बाहेर काढताना एका वयोवृद्ध महिलेचा पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची प्राथमिक माहिती आहे. संबंधित माहिला सदनिकेत एकटी राहत होती. पाणी वाढत असताना तिला अंदाज आला नाही. सदनिकेत पाणी वाढल्यानंतर जीव वाचवण्यासाठी ती घराबाहेर पडली तेव्हा पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाला. संबंधित महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. बेंदरकर आळी येथील एक महिला पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे.

आपत्कालीन मदतीचे साहित्य पाण्यात

पुराचा सामना करण्यासाठी चिपळूण नगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा पावसाळ्यापूर्वी सज्ज होती. तीन बोटी, लाईफ जॅकेट, दोरखंड बोये आणि इतर सामग्रीचा आपत्कालीन यंत्रणेत समावेश होता. हे साहित्य इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या परिसरातील अग्निशमन केंद्रात ठेवण्यात आली होती अग्निशमन केंद्र पाण्याखाली गेल्यामुळे पालिकेची आपत्कालीन यंत्रणाही पुराच्या पाण्यात अडकली आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांचे फोन लागत नाहीत. पालिका परिसरही पाण्यात गेला आहे. त्यामुळे पालिकेतील अधिकारी चिपळूण पोलीस ठाण्यात आले आहेत. पोलीस ठाण्यातून शक्य होईल तेवढे मदत कार्य सुरू आहे. मुरादपुर, पेठमाप, मजरेकाशी, शंकरवाडी, देसाई मोहल्ला, महाराष्ट्र हायस्कूल परिसर, दादरकर मोहल्ला येथील बैठ्या घरांच्या छतापर्यंत पाणी गेले आहे. अनेक कुटुंबे अपार्टमेंटच्या छतावर जीव वाचवण्यासाठी गेली आहेत.

चिपळूणवर आभाळ फाटलं! अतिवृष्टीने भीषण स्थिती; २००५ ची पुनरावृत्ती होण्याची भीती

अनेकांना मदत हवी आहे परंतु संपर्क यंत्रणा ठप्प झाल्याने आणि पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे मदतकार्यात अडथळा निर्माण होत आहेत. शहरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी खासगी बोटींची मागणी करण्यात आली परंतु पाण्याचा प्रवाह जोरात असल्यामुळे या पाण्यातून बोटी चालवणे शक्य नाही त्यामुळे खासगी बोटी चालकांनी आपल्या बोटी पाण्यात घालण्यास नकार दिला

कोविड केंद्रातील २१ रुग्णांचा जीव धोक्यात

चिपळूण पालिका आणि अपरांत रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने खेडेकर क्रीडा संकुल येथे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. त्यात २१ रुग्ण आहेत. येथील ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाला आहे त्यामुळे रुग्णांचे जीव धोक्यात आहे. सेंटरच्या बाहेर उभी असलेली रुग्णवाहिका वाहून गेली आहे. कोविड सेंटरच्या चारही बाजूने पाणी असल्यामुळे आतमध्ये प्रवेश करणे शक्य नाही त्यामुळे रुग्णांना दुपारचे जेवण किंवा इतर मदत कार्य करण्यास अडथळे येत आहेत